भडगाव तालुक्यात पावसाची चांगली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:40+5:302021-06-30T04:11:40+5:30
आज दिवसभर तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये कपाशीसह पिकांना रासायनिक खते दिली. कपाशीवर औषध फवारणीचे कामही केले, तर कुठे कपाशीची बैलजोडीच्या ...
आज दिवसभर तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये कपाशीसह पिकांना रासायनिक खते दिली. कपाशीवर औषध फवारणीचे कामही केले, तर कुठे कपाशीची बैलजोडीच्या साहाय्याने आंतरमशागतीचे काम करताना शेतकरी, शेतमजूर दिसून येत होते. कपाशीसह इतर पिकांच्या निंदणीचे कामही मजूर, शेतमजूर करताना दिसत आहेत, तर कुठे उर्वरित क्षेत्रात शेतकरी पेरणी करत होते.
भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण २४ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण ६० टक्के पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. यात कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, मुगाची पेरणी झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण १२०.२० मि.मी. पाऊस झाल्याची महसूल प्रशासनाने नोंद केलेली आहे. १०० मि.मी.पर्यंत पाऊस झाल्याने व जमिनीत चांगली ओल झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोरडे यांनी केले आहे.
तालुक्यात सध्याच्या पावसाने पिकांसाठी व पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. या पावसाने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकरी तालुक्यात पेरणी करीत आहेत.
===Photopath===
290621\29jal_6_29062021_12.jpg
===Caption===
लोणपिराचे शिवारात कपाशी पिकावर औषध फवारणीचे सुरु असलेले काम.