चांगली कथा रसिकांच्या मनात रेंगाळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:55 AM2018-08-20T00:55:34+5:302018-08-20T00:56:08+5:30
सूर्याेदय सर्व समावेशक मंडळ आयोजित आणि श्री.दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय चौदावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे १९ आॅगस्ट रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (पुणे) होते. प्रा.डॉ.कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.
या वर्षीचे हे सूर्याेदय साहित्य संमेलन ‘कथा’ या वाङ्मय प्रकारास वाहिलेले राहील, असे आपले नियोजन आहे. दरवर्षी वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना केंद्रस्थानी ठेऊन नियोजन केले जात असावे व क्रमाने या वर्षी ‘कथा’ हा वाङ्मय प्रकार आपण संमेलनाच्या केंद्रस्थानी ठेवलेला असावा, असे वाटते. कुठल्या कारणांनी का होईना या वर्षीच्या संमेलनात कथा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेली आहे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते.
एकंदरीत, यावर्षी कथा या वाङ्मय प्रकारावर चर्चा होणे हे मला अत्यंत महत्त्वाचे वाटते कारण
गेल्या काही वर्षात कथा या वाङ्मय प्रकारासंबंधी फारशी चर्चा होताना दिसत नाही. तसेच कथा हा वाङ्मय प्रकार साहित्य व्यवहाराच्या केंद्रस्थानी आहे असेही दिसत नाही. आधुनिक मराठी साहित्याच्या प्रारंभापासूनच कथालेखनाची विशेष दखल घेतली जात असल्याचे दिसते. हरिभाऊ आपटे मोठे कांदबरीकार, परंतु त्यांनी लिहिलेल्या कथा रसिकांना, समीक्षकांना महत्त्वाच्या वाटत होत्या. त्याच काळातील वि.सी. गुर्जर यांचा तर कथालेखन प्रकार समृद्ध करणारा लेखक म्हणून गौरव केला जात असे. आजही आपण तो करतो. पुढे फडके, खांडेकर या लेखकांचा उदय झाला. हे दोेघेही, विशेषत: फडके कांदबरीकार म्हणून अतिशय लोकप्रिय होते. तरीही या दोन्ही लेखकांनी आवर्जून कथालेखन केले. लघुनिबंधही लिहिले. किंबहुना, लघुनिबंध प्रतिष्ठित आणि स्थिर करण्यात या दोन्ही लेखकांचा वाटा आहे. याच काळात ग.ल. ठोकळ, र.वा. दिघे, म.भा. भोसले, श्री.म. माटे या लेखकांनी वैशिष्ट्यपूर्ण असे कथालेखन केले, हे सारेच कथा लेखन मराठी साहित्य समृद्ध करणारे होते, असे मानले गेले.
१९४०-४५ नंतरचा कालखंड तर मराठी कथेच्या दृष्टीने अतिशय भरभराटीचा होता. पुढची ३०-३५ वर्षे कथा जोमाने लिहिली गेली. हा कालखंडच मुळी कथेच्या नावाने ओळखला जातो. त्यास नवकथेचा कालखंड म्हटले जाते. गंगाधर गाडगीळ, पु.भा. भावे, व्यंकटेश माडगुळकर आणि अरविंद गोखले हे कालखंडातील मान्यवर लेखक. किंबहुना असे म्हणता येईल की, या कालखंडातील कथेचीच नाही तर एकूण साहित्याचीच चर्चा या कथाकारांच्या अनुषंगाने होत नाही. या लेखकांनी मराठी कथा आणि एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. परंतु ज्यांची फार चर्चा झाली नाही किंवा केली गेली नाही, असे महत्त्वाचे कथाकार म्हणजे शंकर पाटील, शंकरराव खरात आणि अण्णा भाऊ साठे हे होत.
या सगळ्याच लेखकांनी त्या काळात नवकथा म्हणून जी लिहली जात होती, ती नवकथा समृद्ध केली. कथेच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केले.
स्त्रीवादी साहित्याची चळवळही १९७५ च्या आसपास सुरू झाली. या चळवळीतील अनेक कथा लिहिणाऱ्या लेखिकांचा निर्देश करता येईल. विज्ञान कथांच्या निर्मितीला येथून पुढे बहर येताना दिसतो.
चळवळीशी समकक्ष असलेले जी.ए. कुलकर्णी, श्री.दा. पानवलकर, अनंत विनायक जातेगावकर, भारत सासणे, सानिया, शरदचंद्र चिरमुले आदी लेखक मराठी कथा समृद्ध करीत होते. त्यापैकी भारत सासणे आज या संमेलनात उपस्थित आहेत. अगदी थोडक्यात सांगायाचे तर १९८०-८५ पर्यंत मराठी कथा विविध अंगाची बहरुन येत होती व तिची चर्चाही होत होती. येथून पुढच्या काळात मात्र कथा लिहली जात आहे, पण त्या संबंधीची आवर्जून चर्चा मात्र होत नाही. निवडक कथांची संपादने पूर्वी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असत. अलीकडे हे क्वविचतच होताना दिसते. इतर साहित्य प्रकारांचे जे आढावे घेतले जातात, तसे कथालेखनाचेही घेतले जातात. पण पूर्वी जसे समरसून कथाकारांवर लिहले जात असे, तसे आता क्वचितच होते. नवकथा आणि दलित कथा यांच्या काळात कथा एकूण चर्चेच्या केंद्रस्थानी होती. तसे मात्र पुढे राहिले नाही. चांगली कथा लिहली जात नाही, असे मात्र नाही.
खरे म्हणजे कुठल्याही समाजात निर्माण झालेले ललित साहित्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे असते. ते त्या समाजाचे अंतरंग, भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबरच त्या-त्या संस्कृतीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य करते. संस्कृतीमधील शोषक गोष्टी उजागर करण्याचा प्रश्न करते. अधिक चांगल्या संस्कृतीचे चित्रध्वनीत करण्याची शक्यता असते. परिणामी मानण्याच्या विकासाला हातभार लावण्याचीही शक्यता असते. अर्थात साहित्याच्या क्षेत्रात निव्वळ करमणुकीसाठी, स्वप्नरंजनासाठी काही साहित्य निर्माण होते. तीही एखाद्या समाजाची गरज असू शकते. परंतु त्या पलीकडे जाऊन गंभीरपणे जीवनदर्शन घडविण्याचा प्रयत्न करणारेही साहित्य असते. असे साहित्य माणसाला उन्नत करीत असते आणि कुठलीही संस्कृती उन्नत होण्याचे ध्येय ठेवीत असते किंवा तिने ते ठेवले पाहिजे.
चांगले ललित साहित्य हे सारे करते, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सर्वच वाङ्मय प्रकारांमधून निर्माण झालेले साहित्य हे करत असते. मग एखादी स्फूट चिंतनशील कविता समाजाला जशी अंतर्मुख करील तशीच कादंबरीही करील आणि कथाही करील. नाटकामध्ये तर एकाच वेळी सर्व प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य असते. याचा अर्थ असा की जेथे प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो, ती ती साहित्यकृती- मग ती कुठल्याही वाङ्मय प्रकारात लिहिलेली असो, ती माणसाला अंतर्मुख करते. उन्नत करते.
कथेमध्ये बंदिस्त अशी कथानकाची चौकट असेलच असे नाही. परंतु तेथे एक विशिष्ट असा जीवनार्थ अतिशय टोकदारपणे मांडला जातो. म्हणूनच चांगली कथा रसिकांच्या मनात कित्येक दिवस रेंगाळत राहते. कथेतील सर्व घटक म्हणजे व्यक्ती आणि त्यांचे चित्रण, वातावरण, संवाद आणि भाषा इत्यादी त्या जीवनार्थाच्या टोकदार मांडणीच्या दृष्टीने प्रयत्न करीत असतात. अनुभव अधिकाधिक टोकदार व्हावा यासाठी धडपडत असतात. म्हणून कथेला तपशील फारसे चालणार नाही. नेमके, नेटके तपशील आले की कथेला आकार येत जातो. त्या दृष्टीने कथेच्या भाषेचाही विचार करता येतो. ही भाषा अधिकाधिक सूचक होत जाते. पुष्कळदा ती काव्यात्म होत जाते.
वस्तुत: नियतकालिके म्हणजे साहित्य क्षेत्रातील नियमित संवादाचे एक प्रभावी माध्यम असते. ठरलेल्या कालावधीनंतर नियतकालिक प्रकाशित होते. वाचक वाचतात. चर्चा करतात. वाचकांच्या रसिकतेला त्यामुळे चालना मिळते. नवे महत्वाचे साहित्य तर त्यातून येतेच, परंतु घडणाºया साहित्य चर्चाही महत्त्वाच्या असतात. म्हणून नियतकालिके टिकली पाहिजेत. काही नियतकालीकाची धोरणे आपल्याला मान्य नसतात. तरीही ती टिकली पाहिजेत. कारण त्या निमित्ताने आपल्याला अमान्य असणाºया विषयांची चर्चा कशी केली जाते, ते लक्षात येते. शिवाय लोकशाहीमध्ये सर्व विचारांच्या अभिव्यक्तीला संधी मिळाली पाहिजे हे लोकशाहीचे मूलभूत तत्व असते. एकंदरीत, काय की साहित्य व्यवहाराच्या चलनवलनामध्ये नियतकालिकांचा मोठा वाटा असतो. असे असूनही मराठीतील वाङ्मयीन नियतकालिके कायम आर्थिक अडचणीत का असतात, हा खरा आणि महत्वाचा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात मराठी विषय शिकविणारे किमान १० हजार तरी प्राध्यापक, शिक्षक असतील. कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळाही विपुल आहेत. सार्वजनिक ग्रंथालये भरपूर आहेत. तेव्हा मराठीतील नियतकालिकांना किमान दहा हजारतरी वर्गणीदार मिळायला हरकत नाही. दहा कोटी मराठी भाषकांचे हे राज्य आहे आणि या राज्यात मातृभाषेतील वाङ्मयीन नियतकालिके चालू नयेत हे नेमके कशाचे लक्षण आहे? एकीकडे उत्सवी संमेलने होत आहेत आणि दुसरीकडे नियतकालिके चालू नयेत, अशी परिस्थिती आहे.या निमित्ताने निव्वळ कथा या वाङ्मय प्रकारासाठी वाहिलेले एखादे नियतकालिके निघाले आणि ते भक्कमपणे चालले तर कथेसाठी घेण्यात आलेले संमेलन अधिक अर्थपूर्ण होईल. आपल्या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.