गुडबाय २०१९ : विधानसभा निवडणुकीत भाजप का राहिले ‘मायनस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:20 PM2019-12-29T12:20:32+5:302019-12-29T12:21:57+5:30

सहा जागांवरुन चारवर

Goodbye 19: Why BJP is 'Minus' in Assembly Elections | गुडबाय २०१९ : विधानसभा निवडणुकीत भाजप का राहिले ‘मायनस’

गुडबाय २०१९ : विधानसभा निवडणुकीत भाजप का राहिले ‘मायनस’

Next

सहा जागांवरुन चारवर
यंदाची विधानसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या बंडखोरीमुळे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती नसताना भाजपने जिल्ह्यातील ११ पैकी सहा जागा मिळविल्या होत्या. २०१९मध्ये युती झाली मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या चार ठिकाणी बंडखोरी केली. यात शिवसेनेला मात देण्याचा एकप्रकारे प्रयत्न झाला. मात्र याचा फटका उलट भाजपलाच बसून त्यांच्या जागा सहावरून चारवर आल्या. विशेष म्हणजे एकही बंडखोर निवडून आला नाही.
शिवसेना जिल्हा प्रमुखांचीही बंडखोरी
भाजपकडून बंडखोरी होत असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वत: मुक्ताईनगर या भाजपचा उमेदवार असलेल्या मतदार संघातून अपक्ष म्हणून उभे राहिले व निवडूनही आले.
पंतप्रधानांच्या सभेतच वाद
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीवरून जिल्ह्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच खटके उडत राहिले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीवरून जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यानच गिरीश महाजन यांना जाब विचारला व दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.
खडसेंना उमेदवारी नाकारली
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे रास्ता रोके, जाळपोळ असे मोठे पडसाद जिल्ह्यात त्या वेळी उमटले. अखेर खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.
‘लोकसभे’त बरोबरी
लोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील दोन जागा कायम राखण्यात यश मिळविले. यात रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या विजयी झाल्या तर जळगावातून उन्मेष पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.
उमेदवारी बदलावरून वादंग
लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी नाकारुन विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपने जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र नंतर त्यांचीही उमेदवारी बदलली. त्याचे पडसाद अमळनेरात उमटले व माजी आमदार बी.एस. पाटील यांना मारहाण करण्यात आली.
काँग्रेसने खाते उघडले
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी एकही जागा मिळवू न शकलेल्या काँग्रेसने या वेळी यावल मतदारसंघात विजय मिळवित आपले खाते उघडले.
विजयाचे एकमेकांना आव्हान
विधानसभा निलडणुकीपूर्वीच तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी एकमेकांना विजयी होऊन दाखविण्याचे आव्हान चर्चेचा विषय ठरला.
एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा
अगोदर मंत्रीमंडळातून बाहेर काढणे, विधानसभेची उमेदवारी नाकारणे, नंतर निवडणुकीत कन्येचा झालेला पराभव यामुळे पक्षातील मंडळींवर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले. आपल्या मुलीच्या पराभवास पक्षातील काही मंडळी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
संकलन- विजयकुमार सैतवाल

Web Title: Goodbye 19: Why BJP is 'Minus' in Assembly Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव