विघ्नेश्वराला सगुण साकार रूप देणारे मूर्तिकार गोपाल घोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:16 PM2019-08-31T15:16:24+5:302019-08-31T15:17:22+5:30
सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणेशाचे, विघ्नेश्वराचे घराघरात सोमवारी मांगल्य आणि पावित्र्याच्या सोबतीला ढोलताशांच्या गजरात आगमन होईल.
महेश कौंडिण्य
पाचोरा, जि.जळगाव : सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणेशाचे, विघ्नेश्वराचे घराघरात सोमवारी मांगल्य आणि पावित्र्याच्या सोबतीला ढोलताशांच्या गजरात आगमन होईल. गणेशाची मोहक, सुंदर, विविध आकारातील आणि विविध रूपातील मूर्ती घराघरात विराजमान होते. प्रत्येक भक्त गणेशासमोर नतमस्तक होतोय. या विघ्नेश्वराला सद्गुरू सगुण-साकार रूप देणारे मूर्तिकार आहेत गोपाळ घोडके.
पाचोरा शहरातील या मूर्तिकाराने तीन इंचापासून तर सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती निर्माण केल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यातदेखील पाचोरा शहरात निर्माण झालेलं हे गणेशाचं लोभनीय रूप पोहोचवले ते घोडके परिवारानं.
आज घोडके परिवार म्हणजे पाचोरा शहराला मूर्तिकलेचं वरदान देणारं कुटुंब! इतिहासात एम.ए. झालेले गोपाल दत्तात्रय घोडके हे घोडके घराण्यातील तिसऱ्या पिढीतील मूर्तिकार! वडील आणि आजोबा यांच्याकडून मूर्तिकलेचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. गेल्या ३५ वर्षांपासून ते गणेशाच्या विविध आकाराच्या आणि रूपांच्या मूर्ती निर्माण करत असून ११३ प्रकारच्या गणपतीचे रूप ते साकारतात! भक्त त्या समोर नतमस्तक होतात. गणेश मूर्तींचे विविध साचे ते स्वत: निर्माण करतात आणि मॉडेल बनवण्यापासून ते मूर्ती पूर्ण होईपर्यंत या कार्यात ते प्रत्यक्ष स्वत:ला वाहून घेतात. केवळ लेटेक्स हे अहमदाबादहून त्यांना मागवावे लागतात. मूर्तीतील सजीवपणा हा त्यांच्या कल्पकतेतून साकार होतो. गणेशाच्या मोहक मूर्तीतील डोळे हा सर्वात महत्त्वाचा भाग असून ते भक्तांशी संवाद साधत आहेत इतका सजीवपणा त्यात यावा म्हणून ते स्वत:ला या कार्यात झोकून देतात. प्रामुख्याने दगडू हलवाई, सिद्धिविनायक, लालबागचा राजा, म्हैसूर अशा असंख्य प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती ते निर्माण करतात आणि जळगाव जिल्ह्यासह धुळे, चाळीसगाव ,सुरत अशा विविध शहरांमध्ये त्यांच्या मूर्र्ती पोहोचवल्या जातात. मूर्ती बनवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरुवात होते आणि मे महिन्यापर्यंत मूर्ती बनविल्या जातात. त्यानंतर फिनिशिंग व रंगकाम केले जाते. गणेशोत्सवात सुमारे नऊ ते दहा हजार गणेशाच्या मूर्ती विविध शहरातील विविध व्यापाऱ्यांना ठोक भावाने दिल्या जातात. त्यांचे बंधू विजय घोडके आणि संजय घोडके यांचेसह तिघं भावांच्या सहचारिणी प्रज्ञा घोडके,रंजना घोडके, वैशाली घोडके यांचादेखील त्यांच्या व्यवसायात बरोबरीचा वाटा आहे. अनुवंशिकतेने त्यांच्यासोबतच त्यांची मुलं गौरी घोडके,आदित्य घोडके हेदेखील या उद्योगात वर्षभर वाहिलेले असतात. आज ग्राहकांचा आणि पर्यावरण वादी भक्तांचा शाडूच्या मूर्तीकडे कल वाढल्यामुळे पीओपीच्या मूतीर्ना किंचित कमी मागणी असली तरी गोपाळ घोडके स्वत: शाडूच्या मूर्ती निर्माण करण्याकडे वळू लागले असून, त्यांनी काही मूर्ती विकायला सुरुवातदेखील केली आहे. आज या मूर्ती विविध शहरांमध्ये पोहचवणेदेखील एक यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. प्रचंड उंचीच्या मूर्ती बनवणे ते शक्यतोवर टाळत असून दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी अडचण निर्माण होतो? विसर्जन करताना मूर्ती भंग होण्याची आणि मूर्तीची विटंबना होण्याची भीती असते म्हणूनच सहा फुटापर्यंतच्या मूर्ती निर्माण करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. यावर्षी वरुणराजाची कृपा झाल्यामुळे सर्वांच्या आयुष्यात गणेशाच्या आगमनाने सोबतच सुखाचे आगमन व्हावे, अशीच मागणी त्यांनी त्या विघ्नेश्वराकडे केली आहे.