पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जळगावचा गोपाल तनपुरे तब्बल ८ वर्षे राहिला अनवाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:00 PM2022-06-15T19:00:03+5:302022-06-15T19:00:40+5:30
मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता.
प्रशांत भदाणे
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक जण फॅन आहेत. पण आज आम्ही तुम्हाला मोदींच्या अशा फॅनला भेटवणार आहोत, ज्याची तपश्चर्या पाहून तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता. 8 वर्षे, 13 दिवस तो अनवाणी राहिला. अखेर तो सोन्याचा दिवस उगवला आणि त्याचा संकल्प पूर्ण झाला.
नेत्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जळगावातील भाजपच्या कार्यकर्त्याची ही कहाणी आहे. गोपाल राजमल तनपुरे असं त्याचं नाव. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या लोंढरी गावातील तो रहिवासी आहे. भाजपचा कट्टर समर्थक असलेला गोपाल हा भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या यंग ब्रिगेडचा सदस्य आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्याने एक संकल्प केला होता. मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असं म्हणत त्याने चप्पल घालणंच सोडलं होतं. मोदींच्या भेटीसाठी त्याला तब्बल 8 वर्षे वाट पाहावी लागली. हा काळ त्याच्यासाठी सोपा नव्हता. गोपालचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यामुळे दररोज शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीतही तो अनवाणी पायांनी राहिला. शेतातील काटे, दगड-धोंडे तुडवत त्याने आपल्या शारीरिक कष्टाची तमा बाळगली नाही.
8 वर्षांनी मोदींच्या भेटीची इच्छा झाली पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची गोपालची इच्छा 8 वर्षांनी पूर्ण झाली. भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन त्याची मुंबईत मोदींशी भेट घालून दिली. पुणे जिल्ह्यातील देहू येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले होते. या दौर्यात मोदींनी मुंबईतील कार्यक्रमांनाही हजेरी लावली. त्यावेळी आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गोपालने मुंबईत मोदींची भेट घेतली. मोदींच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर त्याचा संकल्प पूर्ण झाला. आपल्या भेटीसाठी गोपालने आठ वर्षे, तेरा दिवस पायात चप्पल घातली नाही, हे ऐकून मोदीही भारावले. मोदींनी त्याला लगेच चप्पल घालावी असं सांगितलं. मोदींच्या भेटीनंतर त्याचा संकल्प खऱ्या अर्थाने पूर्ण झालाय. इतक्या वर्षांनी त्यानं बुधवारी आपल्या पायात चप्पल घातली.
कार्यकर्तेही खुश
गोपालचा संकल्प पूर्ण झाल्याने भाजप कार्यकर्तेही खुश झाले आहेत. सर्वांनी एकत्र येत गोपालसाठी नवीकोरी चप्पल आणली, त्याच्या श्रद्धेचा सन्मान करत त्याच्या पायात चप्पल घातली. गिरीश महाजन यांच्या जामनेरातील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गोपालला नवी चप्पल दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आपल्याला खूप भावतं. त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मोदींच्या कामाची पद्धत खूप चांगली आहे. त्यांची भेट व्हावी हे माझे स्वप्न होतं. त्यांची भेट झाल्यानंतर मला साक्षात विठ्ठल भेटले, याची अनुभूती आली. माझा संकल्प पूर्ण झाला म्हणून मी आता आठ वर्षांनी पायात चप्पल घालणार आहे.
गोपाल तनपुरे,
मोदींचा चाहता