आरक्षणाबाबत कोणी आडवे आल्यास त्याला तूडवून काढा; गोपीचंद पडळकर यांचं विधान
By Ajay.patil | Published: October 13, 2023 04:55 PM2023-10-13T16:55:15+5:302023-10-13T16:55:24+5:30
आदिवासी बांधवांना पुढं करून शरद पवार त्यांना धनगरांच्या विरोधात फितवताय; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप
जळगाव - आदिवासी बांधवांना पुढं करून शरद पवार त्यांना धनगरांच्या विरोधात फितवताय. त्यांच्या नेतृत्वातले आदिवासी फॉलोअर्स संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
धनगर समाज बांधवांकडून शुक्रवारी शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात धनगर जागर यात्रेचे आयोजनथे करण्यात आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर हे बोलत होते. यावेळी माजी महापौर सदाशिव ढेकळे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, रामेश्वर पाटील, सुरेश धनके, सुभाष सोनवणे, गणेश बागूल यांच्यासह जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडळकरांनी यावेळी बोलतना सांगितले की, धनगर समाजासाठीच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून, आता येथून आपल्याला सर्व पक्षभेद, गट-तट विसरून समाजासाठी, समाजाच्या आरक्षणासाठी काम करावे लागणार आहे. धनगर आरक्षणाबाबत जर आता कोणी आडवे आले, तर त्याला तूडवून काढा असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई सुरु...
आरक्षणासाठी आता न्यायालयीन लढाई सुरु झाली असून, आरक्षणाबाबत सुरु असलेल्या याचिकेवर डिसेंबर महिन्यात निर्णय येण्याची शक्यता गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. आता ही हक्काची लढाई सुरु झाली असून, कोणी कितीही विरोध केला तरी आता आपल्याला थांबायचे नसल्याचे पडळकर म्हणाले.