पाच वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात गोर सेनेतर्फे मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:42 PM2018-10-20T13:42:10+5:302018-10-20T13:42:55+5:30
शिस्तबद्ध मोर्चाने वेधले लक्ष
जळगाव : शहरातील कोल्हे हिल्स परिसरात पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर गोर सेनेतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात येऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका शाळेनजीक झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना गुरूवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली होती. त्यानंतर अवघ्या चार तासात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने नराधमास राजीव गांधी नगरातून अटक केली़ राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी असे त्याचे नाव असून त्याच्याविरूध्द अत्याचार व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी चित्रा चौकात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. या वेळी सेनेचे पूर्ण वेळ विजय चव्हाण यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास रस्ता रोको करण्याचाही इशारा या वेळी देण्यात आला.
मोर्चात चव्हाण यांच्यासह अॅड. सागर राठोड, चेतन जाधव, काशिनाथ चव्हाण, मनोज जाधव, अजय जाधव, सुनील नाईक, राजमल पवार, अभिजित पवार, अमर राठोड, विलास राठोड आदी सहभागी झाले होते.