महापालिका निवडणूक : १०६ वर्षे जुना गोरजाबाई जिमखाना बनला राजकीय घडामोडींचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:04 PM2018-07-11T12:04:54+5:302018-07-11T12:07:56+5:30
विजय कोल्हे अध्यक्ष
जळगाव : महापालिका निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच रंगू लागला असून विविध खेळांसाठी असलेले गोरजाबाई जिमखाना आता राजकीय ‘खेळी’चेदेखील केंद्र बनले असल्याचे चित्र आहे. महापौर ललित कोल्हे यांच्यासह त्यांचे वडील, आई व इतर नगरसेवकांच्या भाजपा प्रवेश निश्चितीची ‘खेळी’देखील येथेच झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली.
सभासदाव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसलेल्या व १०६ वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन या जिमखान्यातच ब्रिटीशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीचा कट शिजल्याचा या निमित्ताने प्रत्यय येत आहे.
मनपा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. गेल्या दोन दिवसात तर अनेक जण इकडून तिकडे प्रवेश करीत असल्याने सर्वांचीच उत्सुकता दररोज शिगेला पोहचत आहे. यात १० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या महापौर ललित कोल्हे, त्यांचे वडील नगरसेवक विजय कोल्हे, आई सिंधूताई कोल्हे यांच्यासह मनसेच्या पाच नगरसेवकांनी रविवारी रात्री जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
या प्रवेशापूर्वी मंत्री महाजन यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन ‘मोठी’ फिल्डिंग लावून ठेवली होती. त्याचाच एक भाग म्हणजे ललित कोल्हे व इतरांचा भाजपा प्रवेश होण्यापूर्वी त्यांच्याही बैठका झाल्या. यात भाजपा प्रवेश करताना कोणती निती असेल या बाबत सर्व काही शिजले ते नगरसेवक विजय कोल्हे अध्यक्ष असलेल्या गोरजाबाई जिमखान्यात.
ब्रिटीशकालीन जिमखाना
नवीपेठेत असलेला हा जिमखाना ब्रिटीश राजवटीचा साक्षीदार आहे. १९१२मध्ये स्थापन झालेल्या या जिमखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सभासदांशिवाय कोणाही प्रवेश नाही. तशा सूचनाच येथे फलकावर लावण्यात आल्या आहेत. मात्र अध्यक्ष असलेले विजय कोल्हे यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील तीन सदस्य व इतरांच्या भाजपा अर्थात राजकीय पक्ष प्रवेशाची बैठक या जिमखान्यात झाली.
विविध खेळ की राजकीय ‘खेळी’चा आखाडा
१०६ वर्षापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी सिमकॉक्स यांनी शहरवासीयांसाठी जिमखान्याची स्थापना केली. विविध खेळांसाठी असलेल्या या जिमखान्यात मात्र आज खेळांसोबत राजकीय खेळीदेखील होऊ लागल्याने जिमखाना राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे.
ब्रिटीश नितीचा अवलंब
विकासाची भाषा करणाऱ्या भाजपाला इतरांचे उमेदवार पळविण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित होत असतानाही सत्तेसाठी ब्रिटीशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीचा ब्रिटीशकालीन जिमखान्यातच अवलंब केला गेला हे विशेष.