संताप अनावर झाला अन् आईला केली मारहाण; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
By सागर दुबे | Updated: April 29, 2023 17:18 IST2023-04-29T17:17:47+5:302023-04-29T17:18:39+5:30
मुलाविरूध्द गुन्हा.

संताप अनावर झाला अन् आईला केली मारहाण; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: एका घरामध्ये काही व्यक्तींसोबत आई दिसल्यानंतर संतापलेल्या मुलाने आईला लोखंडी सळईने हातासह कमरेवर आणि पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता वडली गावामध्ये घडली होती. दरम्यान, जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला वडली येथे दोन मुलांसह वास्तव्यास होती. सोमवारी रात्री १० वाजता महिलेची दोन्ही मुलं गावातील एका लग्नात नाचत होती. त्यावेळी त्यांना त्यांची आई एका घराकडे जाताना दिसून आली. ही बाब त्यांनी लागलीच शेजारीच राहत असलेल्या मामाला सांगितली. नंतर तिघेही त्या घराकडे गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला; पण आतून कुणीही दरवाजा उघडत नव्हता. अखेर मुलाने जोरात धक्का देऊन दरवाजा उघडला. तेव्हा त्यांची आई ही काही व्यक्तींसोबत दिसून आली. याचा राग येऊन मुलाने बाजूलाच ठेवलेली सळई उचलून आईला मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. त्यांना लागलीच रुग्णवाहिका बोलवून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
अन् प्राणज्योत मालवली...
महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. अखेर महिलेच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मयताच्या मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"