काय झाले विचारले अन् झाला सू-याने वार; एमआयडीसी पोलिसात गुन्हा
By सागर दुबे | Published: April 9, 2023 03:03 PM2023-04-09T15:03:37+5:302023-04-09T15:03:51+5:30
मध्यरात्री जाळली दुचाकी
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : उस्मानिया मशिदीजवळील गल्लीमध्ये तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला काय झाले, अशी विचारणा केल्यानंतर त्याचा त्याला राग येऊन आसिफ खान यासीर खान (२५, रा. पोलिस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) या तरूणाच्या हातावर कोंबडी कापण्याच्या सु-याने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. एवढेच नव्हे तर त्या तरूणाने मध्यरात्री खान यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकली. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पोलिस कॉलनी येथील आसिफ खान हे शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उस्मानिया मशिदीमध्ये नमाज पठणासाठी जाते होते. मशिदीजवळील गल्लीत त्यांच्या ओळखीच्या काही तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला त्यांनी काय झाले अशी विचारणा केली. मात्र, त्या तरूणाने त्यांच्याशी वाद घालून कोंबडी कापण्याच्या सु-याने त्यांच्या हातावर वार केला. भांडण सोडविण्यासाठी खान यांचे भाऊ व वडील आल्यावर त्यांना सुध्दा दोन जणांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आजू-बाजूच्या लोकांनी भांडण सोडवून खान यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्रीच ते उपचार घेऊन घरी परतले.
मध्यरात्री दुचाकी जाळून पळाला...
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री २.१० वाजेच्या सुमारास आसिफ खान यांच्या भावाला अचानक जाग आली. त्याला घराबाहेर त्यांची एमएच.१९.डीएस.७९६९ क्रमांकाची दुचाकी ही जळताना दिसून आली. ही बाब त्याने कुटूंबियांना सांगितली. खान कुटूंबिय घराबाहेर आल्यानंतर त्यांनी आजू-बाजूच्या गल्लीत दुचाकी जाळणा-याचा शोध सुरू केला. तेव्हा आसिफ खान यांना मारणारा तरूण हा हातात प्लॅस्टिकची बॉटल घेऊन पळताना दिसून आला. अखेर शनिवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"