शासकीय दंत महाविद्यालयात 50 जागांसाठी प्रवेश मिळणार
By admin | Published: July 5, 2017 05:56 PM2017-07-05T17:56:51+5:302017-07-05T17:56:51+5:30
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीकडून जागेची पाहणी. कुलगुरुंकडे लवकरच अहवाल सादर करणार
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.5 - वैद्यकीय महाविद्यालयासोबतच पुढील वर्षी दंत महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरूहोणार आहे. पहिल्या वर्षी 50 जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चार सदस्यीस समितीने बुधवारी जळगावात येऊन दंत महाविद्यालय सुरू करण्यासाठी चिंचोली शिवारात जागेची तसेच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सादर केला जाणार आहे.
दंत महाविद्यालय सुरूकरण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चार जणांची समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ.हेमंत उमर्जी (मुंबई), सदस्य डॉ.किशोर महाले, डॉ.राजन मुंदडा व डॉ.राजन बिंदू (औरंगाबाद) आदी जणांची समिती बुधवारी सकाळी जळगावात दाखल झाली. त्यांनी प्रथम जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन महाविद्यालय सुरू करण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
चिंचोली शिवारात जागेची पाहणी
जिल्हा रुग्णालयातून निघाल्यानंतर या समितीने चिंचोली शिवारात जागेची पाहणी केली. तेथे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील व जी.एम.फाउंडेशनचे अरविंद देशमुख यांनी त्यांना माहिती दिली.
जळगावात महाविद्यालय सुरू करण्यायोग्य स्थिती आहे का? तेथे सुविधा उपलब्ध होऊ शकतात का? तसेच दंत महाविद्यालयाची आवश्यकता आहे का? याबाबत पाहणी करून कागदपत्रांची पडताळणी केली.
या पाहणीचा अहवाल राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) यांची समिती जळगावात जागा व आवश्यक सुविधांची पाहणी करणार आहे.
दिल्लीच्या समितीचा अहवाल अंतिम असेल व तेच महाविद्यालयाला परवानगी देतील. ऑक्टोबर्पयत ही समिती जळगावात येणे अपेक्षित आहे.
राज्यातील चौथे महाविद्यालय
राज्यात मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथे शासकीय दंत महाविद्यालय सुरू आहेत. आता जळगावचे हे चौथे महाविद्यालय असेल. त्याचा खान्देशातील विद्यार्थी व रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. आगामी वर्षात 50 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कुलगुरूंकडून येत्या आठवडाभरातच जिल्हा रुग्णालयाला सकारात्मक पत्र प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
आठ डॉक्टर व इतर कर्मचारी
पहिल्या वर्षासाठी आठ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांची तत्काळ नियुक्त करण्यासाठी शासन स्तरावर प्रय} सुरू झाले आहेत. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पाठपुरावा करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.