शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शुल्क वाढ रद्द करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:09 AM2020-09-12T10:09:20+5:302020-09-12T10:09:48+5:30
जळगाव : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात पालक व विद्यार्थी होरपळत असताना मागील वर्षाचे शैक्षणिक ...
जळगाव : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात पालक व विद्यार्थी होरपळत असताना मागील वर्षाचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे हा प्रश्न पालकांसमोर आहे. त्यातच स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. हे अन्यायकारक असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होऊ शकते. दरम्यान ही शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्राचार्य प्रा.डॉ. आर.डी. कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भाररतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थी हिताच्या विविध मागण्यात करण्यात आल्या आहे. यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी लागू करण्यात आलेली दहा टक्के अन्यायकारक शुल्कवाढ रद्द करण्यात यावी, येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश शुल्क ३० टक्के सरसकट कमी करावे आणि फीच्या किमान १० टक्के रक्कमेवर चालू शैक्षणिक वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क ३ टप्प्या ऐवजी ६ टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात यावी. मागील सत्रातील १५ मार्चपासून लायब्ररी फी, जिमखाना फी, लॅबोरेटरी फी, हॉस्टेल फी, सोशल गॅदरिंग फी या सर्व व इतर फी विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी आणि जो पर्यंत महाविद्यालय सुरू होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून ही फी घेऊ नये, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना अद्यापही मिळाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांची शिष्यवृत्ती त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. यावेळी महानगरमंत्री रितेश चौधरी, पवन भोई, हर्षल तांबट, संकेत सोनवणे, आदेश पाटील उपस्थित होते.