सरकारी निधीवर ‘डॉक्टरी बाबूंचा’ डल्ला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:28 PM2019-12-16T12:28:08+5:302019-12-16T12:28:39+5:30
चौकशी समिती गठीत : रावेर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
जळगाव : सरकारी वेतन घेऊन खासगी रुग्णालयात प्रसुती आणि भूलच्या निधीवर कंत्राटी डॉक्टरांनी सरकारी निधीवर डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. रुग्णालय अधीक्षक, स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाचजणांची समिती गठीत करण्यात आली आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ (पूर्ण वेळ) तर भूलतज्ज्ञ (आॅनकॉल) या पध्दतीने २०१८ मध्ये डॉ. उदय पाटील (रा.बोदवड) तर १८ जानेवारी ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत डॉ. नीलेश श्रीराम पाटील (रा.रावेर) यांची नियुक्ती करण्यात आली होती.
भूलतज्ज्ञ डॉक्टरांना सेवेसाठी प्रत्येक सिझेरीयन प्रसुती (सर्जरी)साठी ४ हजार रुपये शासनाकडून देण्यात येतात. डॉ. उदय पाटील यांनी त्यांच्या काळात कधीच सेवा दिलेली नसताना त्यांच्या नावावर ७० सिझेरीयन दाखवून प्रति ४ हजार रुपये प्रमाणे पेमेंट त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आले. प्रत्यक्षात भूल देण्याचे काम डॉ. नीलेश पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रसुती सरकारी रुग्णालयात करणे अपेक्षित असताना खासगी रुग्णालयात झाल्या आहेत.
नियमानुसार एखाद्या रुग्णाची सिझेरीयन प्रसुती वेळेस तपासणी रेकॉर्डवर बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी व भूलतज्ज्ञ यांनी तपासणीबाबत नोंद करणे बंधनकारक असताना ग्रामीण रुग्णालयात याची कोणतीही नोंद नाही.
दिनेश कडू भोळे यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध करुन त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिधी तक्रार केली आहे. दरम्यान, याबाबत डॉ. उदय पाटील यांना विचारणा केली असता आपली नियुक्ती झालेली असली तरी प्रसुतीवेळी वेळेत पोहचणे शक्य नव्हते, त्याकाळात रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून डॉ. नीलेश पाटील यांनी ही प्रक्रिया केलेली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत असे करता येते असेही त्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर चौकशीसाठी पाचजणांची समिती गठीत करण्यात आली आहे. सरकारी निधीचा खरोखर दुरुपयोग झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर संबंधित डॉक्टरांकडून ही रक्कम वसूल केली जाईल. अजून चौकशी सुरु आहे. लवकरात लवकर अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक
चौकशी समितीचा फार्स
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. तासखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आतापर्यंत फक्त एकदाच रुग्णालयात भेट देवून चौकशी केली. आणखी किमान पाचवेळा रावेरला जावे लागणार आहे. स्वतंत्ररित्या चौकशी व रेकॉर्ड तपासावे लागणार असून त्यासाठी कालावधी लागेल, असे समितीतील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चौकशी समिती नुसता फार्स असल्याचीही टीका होऊ लागली आहे.