४२ कोटींच्या निधीला शासनाकडून ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:16+5:302021-01-14T04:14:16+5:30
आमदार सुरेश भोळेंची माहिती : वर्षभरापूर्वी शासनाने दिली होती स्थगिती; ५८ कोटींच्या निधीची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...
आमदार सुरेश भोळेंची माहिती : वर्षभरापूर्वी शासनाने दिली होती स्थगिती; ५८ कोटींच्या निधीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, विद्यमान शासनाने स्थगिती दिल्याने शहरातील विकासकामे थांबली होती. मात्र, १०० कोटींपैकी मंजूर ४२ कोटींच्या कामांवरील स्थगिती शासनाने बुधवारी उठविली असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. दरम्यान, उर्वरित ५८ कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नसून, हा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहितीही भोळे यांनी दिली.
मनपात सत्तांतर होऊन भाजपची एकहाती सत्ता आली. त्यामुळे शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरात गटारी, नाल्यांची संरक्षण भिंत, मोकळ्या जागांचा विकास, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम अशी कामे केली जाणार होती. मात्र, शासनाने स्थगिती दिल्यामुळे १०० कोटींतून एक रुपयाही खर्च झालेला नव्हता. आता मात्र स्थगिती उठविण्यात आल्याने ही कामे होऊ शकणार आहेत.
निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम ?
या निधीतून विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधिकृत करण्यात आले आहे. १०० कोटीतून ४२ कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. त्याच कालावधीमध्ये शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थगिती उठविल्यानंतर ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत मनपा आयुक्तांना विचारले असता, याबाबत अजून माहिती नसल्याचे सांगितले.