सरकारी वकील मृत्यू प्रकरणी डॉ. भरत पाटील यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:32 PM2019-01-22T18:32:55+5:302019-01-22T18:33:27+5:30
कारागृहात रवानगी
जामनेर : सरकारी वकील राखी पाटील यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेले अॅड. राखी पाटील यांचे पती डॉ.भरत पाटील यांना न्या. सचिन हवेलीकर यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयातून त्यांची जळगाव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
डॉ.पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. या वेळी त्यांनी सांगितले की, संशयित डॉ.पाटील यांनी त्यांची पत्नी राखी यांचा खून कोणत्या कारणासाठी केला याचा तपास करायचा असून दुसरे संशयित लालसींग पाटील यांनाही अटक करावयाची आहे.
घटनेच्या दिवशी डॉ.पाटील व पत्नी राखी यांच्यात झालेल्या झटापटीत राखी यांचा मोबाईल फुटला असून राखी यांच्या चेहऱ्यावर व हातावर जखमा असल्याचे सांगण्यात आले. डॉ.भरत यांचा पत्नीवर संशय असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. मात्र जबाबात डॉ.पाटील हे उलटसुलट माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असत.
दरम्यान, दुसरे संशयित लालसिंंग पाटील हे फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक भुसावळ तालुक्यात गेले होते. मात्र लालसिंग पाटील यांचा तपास लागला नाही.