शासकीय वैद्यकिय सेवा सोमवारपासून महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:37 PM2019-06-08T12:37:36+5:302019-06-08T12:38:02+5:30
गरीबांच्या खिशाला बसणार आर्थिक झळ
जळगाव : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारपासून वैद्यकिय सेवा महागणार असून त्यामुळे गरीबांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. वैद्यकिय सेवेचे नवीन दर तसे २०१७ पासून लागू करण्याचे शासनाचे परिपत्रक आहे, मात्र जळगावला नवीनच वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाल्याने हे दर लागू केलेले नव्हते.
दीड वर्षापूर्वी येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाले. सध्या त्याचा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीतच कारभार सुरु आहे. २०१७ मध्ये रुग्णसेवेचे दर वाढलेले असले तरी शासकीय महाविद्यालयात जिल्हा रुग्णालयाच्या दरातच रुग्णांची तपासणी व उपचार केले जात होते. बाह्यरुग्ण विभागाचे (केसपेपर) शुल्क आता २० रुपये करण्यात आले आहेत. पूर्वी दहा रुपये आकारले जात होते. दहा रुपयात मिळणारे जेवण आता ३० रुपयात मिळणार आहे. त्याशिवाय आंतररुग्ण (दाखल) विभागाचेही दर ३० रुपये करण्यात आले आहेत. पूर्वी हे दर १५ रुपये होते, त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सीटीस्कॅनच्या दरात ५० तर इसीजी व एक्स रे च्या दरात २० रुपयांनी वाढ झालेली आहे.
दीड वर्ष रुग्णांचा फायदा
महाराष्टÑातील सर्वच शासकीय महाविद्यालयात हे नवीन दर २०१७ पासून लागू झालेले आहेत. जळगावचे वैद्यकिय महाविद्यालय नवीन असल्याने वाढीव दर लावण्यात आलेले नव्हते. आता या रुग्णालयात सर्वच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने सोमवारपासून वाढीव दर लागू करण्याचा प्रशासनाने घेतला आहे. दारिद्र रेषेखालील कुटुंबियांना मोफत उपचार केले जातात.
रोज १२०० रुग्णांची तपासणी
वैद्यकिय महाविद्यालयात दिवसाला एक हजार ते बाराशे रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात तर ३० ते ४० रुग्ण दररोज अॅडमीट होतात. आज मितीस ४३० रुग्ण रुग्णालयात अॅडमीट आहेत. प्रसुतीसाठी महिला रुग्ण व अपघाताची संख्या सर्वाधिक असते. नवजात शिशू कक्षात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील बुलडाणा, औरंगाबाद व बºहाणपुर येथून येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
असे आहेत नवीन दर
बाह्यरुग्ण विभाग (केस पेपर) : २० रुपये
आंतररुग्ण विभाग : ३० रुपये
आहार शुल्क : ३० रुपये
इसीजी : ७० रुपये
एक्स रे : ७० रुपये
सोनोग्राफी : ११० रु. सीटी स्कॅन : ३५० रु.
वैद्यकिय सेवेतील प्रत्येक प्रकारातील दरात वाढ झालेली आहे. ही वाढ फारसी नाही. १० ते ५० रुपयांच्या घरातच वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. वैद्यकिय महाविद्यालय झाल्याने नवीन यंत्र दाखल झाले आहेत. दिवसाला एक हजाराच्यावरच रुग्णांची तपासणी होते. कधी कधी तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होतात. रुग्णसेवा असल्याने टाळता येत नाही. उपचार करावेच लागतात.
-डॉ.किरण पाटील, वैद्यकिय अधीक्षक,
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय