कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे शासनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:20 PM2020-08-20T12:20:46+5:302020-08-20T12:20:56+5:30
कार्यवाहीला सुरुवात : शिक्षक संघटनांच्या मागणीला यश
जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिक्षकांना कोरोना संबंधित कामे देण्यात आली होती़ या कामातून आता लवकरच शिक्षकांची सुटका होणार आहे़ शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून शिक्षकांना कोरोना ड्युटीतून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश सोमवारी शासनाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहे़ त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे़ त्यामुळे आता कोविड ड्युटी संपवून पुन्हा गुरूजी अध्यापनाच्या कामाला लागणार आहेत़
राज्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातल्यामुळे राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी लॉकडॉऊनही जाहीर करण्यात आले़
गुरूजी पुन्हा अध्यापनाला
कोविड ड्युटीतून कार्यमुक्त झाल्यानंतर त्या शिक्षकांना आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचेही शासनाने सांगितले आहे़ त्याचबरोबर अन्य आस्थापनेवर सामायोजित सरप्लस असलेल्या व इतर आस्थापनेवर सामायोजित न झालेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच्या शाळेत बोलवून आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यााबत शिक्षण विभागाने सांगितले आहे़
शासनाचे कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश विभागाला प्राप्त झालेले आहे़ त्यानुसार स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून शिक्षकांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे़
- बी़एस़अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
कोविड सेवेतून शिक्षकांना वगळून त्यांना आॅनलाईन शिक्षण प्रक्रियेत समावेश करावा, ही मागणी शिक्षक भारती संघटनेकडूनही करण्यात आलेली होती़ संघटनेच्या मागणीला यश आले असून शासनाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो़
- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना