महावीर जैन याच्या जामिनाला सरकार पक्षाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:35+5:302021-03-31T04:16:35+5:30
जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी महावीर जैन याच्या जामीन अर्जाला मंगळवारी सरकार ...
जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी महावीर जैन याच्या जामीन अर्जाला मंगळवारी सरकार पक्षाने जोरदार विरोध केला. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे.
पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात बीएचआर प्रकरणाचे कामकाज होत आहे. जैन याची बीएचआरमधील नियुक्ती बेकायदेशीर आहे. त्याला गुन्ह्यासंबंधी सर्व माहिती पूर्वीपासूनच होती. मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारे याला वाचवण्यासाठी जैन याने बनावट अहवाल तयार केला आहे. त्यामुळे जैन याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.
महावीर जैन, विवेक ठाकरे याच्यासह पाच संशयितांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावातून अटक केली होती. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जैनसह सर्वजणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील कमलाकर कोळी या एका संशयितास नंतर न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे, तर इतर सर्वजण अद्याप कारागृहात आहेत. दरम्यान, जैन याने जामिनासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २४ मार्च रोजी जैन याच्या बाजूने वकिलांनी युक्तिवाद केला होता, तर मंगळवारी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद केला.