३९ शेतकऱ्यांची ज्वारी मोजून शासकीय खरेदी बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:27+5:302021-06-27T04:12:27+5:30
शासनाने हमीभावात शेतकऱ्यांचे भरड धान्य खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र उशिरा सुरू केले. पाचोरा येथील शेतकरी सहकारी संघास खरेदीसाठी एजन्सी ...
शासनाने हमीभावात शेतकऱ्यांचे भरड धान्य खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र उशिरा सुरू केले. पाचोरा येथील शेतकरी सहकारी संघास खरेदीसाठी एजन्सी दिली. भरड धान्य खरेदीसाठी २२ जूनला पाचोरा शेतकी संघाने सुरुवात केली. अवघ्या चार दिवसांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत ज्वारी खरेदी तत्काळ बंद केली आहे.
पाचोरा शेतकी संघास ११०२ शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. शासनाने केवळ १९५० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. शेतकी संघाने हे उद्दिष्ट ३९ शेतकऱ्यांचा १९५० क्विंटल माल खरेदी करून ज्वारी खरेदी बंद केली आहे. यामुळे १०६३ शेतकऱ्यांची ज्वारी अद्याप विक्रीसाठी घरात पडून आहे. शासनाचा हमी भाव ज्वारी रुपये २६२० प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना शासन खरेदीवर आशा होती. मात्र, शासनाने किरकोळ खरेदी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. उर्वरित शेतकरी वाऱ्यावर सोडले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ज्वारी खरेदी पूर्णपणे करावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच?
मका खरेदीसाठी पाचोरा शेतकी संघाकडे ९१६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन बुकिंग केली असून, शासनाने ५८९० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. सोमवार, दि. २८ पासून मका खरेदी सुरू होत आहे. रुपये १८५० प्रति क्विंटल शासकीय हमी भाव असून, अनेक शेतकऱ्यांचा माल शासकीय खरेदीच्या आशेवर घरातच पडून आहे. शेतकऱ्यांचा मालाचा शेवटचा दाणाही खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असताना अशा निर्णयाने क्रूर चेष्टाच केली
असून ज्वारी खरेदी बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांची पूर्णपणे करावी, अशी मागणी होत आहे.
भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे शासनाने भरड धान्य बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी. असा शेतकी संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव केला असून मुदत व अमर्याद खरेदीचे उद्दिष्ट मिळण्याची मागणी केली आहे.
- सुनील पाटील, अध्यक्ष, शेतकरी सहकारी संघ पाचोरा.