गणेशोत्सवात शासकीय उपक्रमांची आरास करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:10 AM2018-09-10T01:10:56+5:302018-09-10T01:11:44+5:30
चाळीसगावला समन्वय बैठक : किशोरराजे निंबाळकर यांचे आवाहन
चाळीसगाव, जि.जळगाव : गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव असून यात मतदार यादी, मतदान यंत्रे आणि केव्हीपॅड मशिन (मतदानानंतर पावती देणारी यंत्रणा) या उपक्रमांची आरास गणेशोत्सव मंडळांनी करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे राजे निंबाळकर यांनी येथे केले.
रविवारी सायंकाळी सहा वाजता राजपूत लोकमंगल कार्यालयात पोलिस प्रशासनातर्फे आयोजित समन्वय बैठकीत मार्गदर्शन करतांना त्यांनी हे आवाहनही केले. अध्यक्षस्थानी आमदार उन्मेष पाटील होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, गटनेते राजेंद्र चौधरी, उपसभापती संजय पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, अॅड. ईश्वर जाधव, प्रांताधिकारी शरद पवार, डीवायएसपी नजीर शेख, तहसिलदार कैलास देवरे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाट यांच्यासह भडगाव तालुक्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव आणि मोहरम हे सण शांततेसह सलोख्याने साजरे करावे. डाल्बी, डीजे आणि दारुमुक्त गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी सामाजिक उपक्रमही राबवावे. यावर्षी प्रबोधन आणि सामाजिक जागृती करणाऱ्या मंडळांना 'विघ्नहर्ता' पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. हे पुरस्कार तालुकास्तरावर देण्यात येतील. डीजे आणि डाल्बी वाजविणाºया मंडळावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दत्ता शिंदे यांनी केल्या.
प्रशासन, शासन आणि जनता यांच्या समन्वयातून उत्सवातील आनंद द्विगुणित होईल. यामुळे सज्जन शक्तिला चालना मिळेल, असे मत उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
बैठकीत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक खलाणे यांनी अवैध धंदे वाढल्याचा मुद्दा मांडला. आर.डी.चौधरी यांनी विजेच्या प्रश्नासह सुरक्षेच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीत काम करणाºया परप्रांतीयांची यादी तयार करावी, यावर लक्ष वेधले. चंद्रकांत तायडे, गफुर शेख, भाऊसाहेब सोमवंशी, कैसर अहमद, आनंदा कोळी, लक्ष्मण शिरसाट, रमेश सोनवणे यांनी समस्या मांडल्या. गणपती विसर्जनासाठी गिरणा नदीपात्र स्वच्छ करण्यासह गणपती मंडळांच्या नोंदणी बाबतही मुद्दे उपस्थित झाले. बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्यावर्षी विजेत्या ठरलेल्या गणेश मंडळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक नजीर शेख यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. किरण गंगापुरकर यांनी केले तर आभार रामेश्वर गाढे पाटील यांनी मानले.
गणपती मंडळांची नोंदणी करण्यासाठी एक खिडकी सोमवारपासून सुरू करण्यात येईल.
मंडळे आपली नोंदणी आॅफलाईन व आॅनलाईन करु शकतील.
विविध उपाययोजनांवर बैठकीत झाली चर्चा