सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 04:25 PM2019-06-08T16:25:48+5:302019-06-08T16:26:05+5:30
जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार तथा करविषयक पुस्तकांचे लेखन करणारे अनिलकुमार शाह यांनी बांगला देशात भेट दिली होती. या भेटीवर आधारित लेखमाला त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिली. आज या लेखमालेचा शेवटचा बारावा भाग.
बांगला देशात मी खूप काही फिरलो नाही, पण एकूणच जी मोठमोठी पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, सरकार लोकभावनांप्रती संवेदनशील आहे, जागरूक आहे, त्यावरून येणाऱ्या पाच वर्षांनी बांगला देश नक्की वेगळा असेल असे मला वाटते.
आपल्या देशातून गंगा निघते ती या देशात नवाबगंजजवळ पद्मा होते. पुढे मेघनाला जाऊन मिळते आणि मेघना होऊनच बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मपुत्रेचे पात्र आसामपासून भारतातील भागात ते बांगला देशात शिरेपर्यंत आणि पुढेही खूप विशाल आहे. बांगला देशात तिही पुढे पद्मा नदीला जाऊन मिळते आणि पद्मा पुढे मेघनाला. पद्मा नदीला या देशाची जीवनदायिनी म्हणतात.
बांगला देश स्वतंत्र झाल्यावर भारताने मार्च १९७२ मध्ये त्यांच्याशी १२ कलमी शांतता करार केला होता. भारताने २०१७ ला संपलेल्या ७ वर्षात त्यांना ६०,८०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. विदेश मंत्रालयाने भारत-बांगला देश संबंधावर सप्टेंबर २०१७ मध्ये एक विशेष पत्रिका जाहीर केली आहे. त्यात दोन्ही देशात झालेले विविध करार आणि अनेक पातळ्यांवर संबंध विकसित कसे होत आहेत याची सविस्तर माहिती दिली आहे.
त्यातली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. भारतातून वाहणाºया ५४ नद्या बांगला देशात जातात. त्यामुळे बांगला देशातल्या नद्यांच्या सफाईच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भारत मोठे आर्थिक सहाय्य करीत आहे. साधारण ४०० कोटी रुपये खर्चाच्या ८० टक्के खर्च भारत देतोय. त्यामागे अर्थातच भारताचा स्वार्थही आहेच. आसामसह पूर्वोत्तरची सातही राज्ये जलमार्गाने बांगला देशच्या चित्तगोंग बंदराशी थेट जोडली जातील. तेथून थेट आयात-निर्यात जगभरात होऊ शकते. पर्यायाने ती सातही राज्ये उर्वरित जगाशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. याचा खूप मोठा फायदा आपल्या पूर्वोत्तर राज्यांना व भारताला होईल हे निश्चित.
एक विलक्षण गोष्ट सांगून ही साठा उत्तराची प्रवासकथा, लोकमत आणि खास करून जळगावचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे अत्यंत मन:पूर्वक आभार मानून, बारा उत्तरी थांबवतो.
बांगला देशाचे राष्ट्रगीत- ‘आमार शोनार बांगला, आमी तोमाय भालोबाशी, चिरोदिन तोमार आकाश, तोमार बाताष आमार प्राणे बजाय बाशी...’ लोकसंगीतात बांधलेले हे सुंदर गीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वत:च्या बंगाल राज्याची महती म्हणून लिहिले आहे. १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मूळ गीतातल्या पहिल्या दहा ओळी या देशाने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या. समर दास या प्रसिद्ध संगीतकाराने ते राष्ट्रगीत वाटावे म्हणून नव्याने संगीतबद्ध केले. हे राष्ट्रगीत मी तेथे रोटरीच्या सभेत ऐकले. एकाच कवीची दोन गीते दोन शेजारी राष्ट्रांची राष्ट्रगीते आहेत हा विलक्षण आणि जगात एकमेव योग. बांगला देश आणि भारत यांचा हा अनोखा संबंध एका कवीने त्यांच्या स्वत:च्याही नकळत बांधून दिला, कायमचा. कवी कोणत्याही देशाच्या कसा सीमापार असतो हे चक्षुर्वैसत्यम पाहून गुरुदेवांना मी मनोमन वंदन केले आणि बांगला देशाचा निरोप घेतला. (समाप्त)
-अनिलकुमार शाह, जळगाव
मोबा. ९४२२२ ७६ ९०२