शासनाने ग्रंथालय व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:31 AM2018-12-31T01:31:12+5:302018-12-31T01:32:35+5:30

राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे विचार निसर्ग कवी, पद्मश्री ना.धों. महानोर यांनी रविवारी येथे मांडले.

Government should give support to the library and farmers | शासनाने ग्रंथालय व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा

शासनाने ग्रंथालय व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा

Next
ठळक मुद्देपद्मश्री ना.धों.महानोर यांचे प्रतिपादनजामनेरला तावडी बोली साहित्य संमेलनात साहित्यिकांची मांदियाळीसाहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन

जामनेर, जि.जळगाव : राज्यातील साडेबारा हजारांपैकी साडेसात हजार सार्वजनिक ग्रंथालये शासकीय अनुदानाअभावी बंद पडली. जी ग्रंथालये सुरू आहेत ती तुटपुंज्या अनुदानावर कशी जगतील हा प्रश्न आहे. शासनाने ग्रंथालयाप्रमाणेच शेतकºयांचे दु:ख समजून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे विचार निसर्ग कवी, पद्मश्री ना.धों. महानोर यांनी रविवारी येथे मांडले.
पहिले राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलन जामनेर येथील एकलव्य माध्यमिक शाळेच्या प्रांगणात झाले. उद्घाटन महानोर यांनी, तर मान्यवरांनी दीपप्रज्वालन केले.
महानोर यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरींचे पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव शासन देते याचा अर्थ असा की, शासन जनसामान्यांच्या मागणीचा आदर करते.
माझे जगणे शेतीसाठीच आहे, मी आधी शेतकरी, नंतरच कवी. माझे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील असले तरी माझे ऋणानुबंध जामनेर तालुक्यातीलच घट्ट आहेत. शेंदुर्णीत शिक्षण घेतले या गावाने मला संस्कार दिले.
खान्देशचे मोठेपण सांगताना महानोर म्हणाले, काव्यरत्नावलीकार नानासाहेब फडणविस ४५ वर्षे जळगाव जिल्ह्यात वास्तव्य करून होते, केशवसुत, बालकवी, साने गुरूजी, बा.सी.मर्ढेकर, विं.दा. करंदीकर इथेच रमले. शेंदुर्णीला दु.आ.तिवारींचा समृद्ध साहित्याचा साठा मी जपून ठेवला आहे. पु.ल.देशपांडे, सुधीर फडके, ग.दी.माळगुळकर ही साहित्यातील मोठी माणसे आहेत.
अ.भा. साहित्य संमेलन व विश्व मराठी साहित्य संमेलनास मी जाणार नाही, असे यावर्षी जाहीर केले. तरी मी जामनेरला का आलो, याबाबत बोलताना महानोर यांनी सांगितले की, मी खेड्यातील छोटा कवी म्हणून पुढे आलो. ग्रामीण भागातील बोली भाषेवर संमेलन करणाºयांना बळ मिळावे यासाठी मी आलो.
महानोर यांनी शरद पवार यांनी जळगाव येथून काढलेल्या शेतकरी दिंडीची आठवण यावेळी सांगितली. जामनेर मुक्कामी दिंडी आली असताना आपण हातात तंबोरा घेऊन शेतकºयांसमोर त्यांच्या वेदना मांडणाºया कविता सादर केल्या. शेतकºयांनासुद्धा वाटले की कुणीतरी आपल्या व्यथा जाणणारा आहे. इतर राजकीय नेत्यांपेक्षा अल्प दिंडीतील शेतकरी शोधत होते.
प्रत्येकाच्या घरातील देवघरात देव आहेत, पण तुम्ही तुमच्या घरात देवरुपी ग्रंथ ठेवा, असा आग्रह करीत ते म्हणाले, आजची पिढी पुस्तकापासून दुर चालली आहे. वाचनसंस्कृती कमी होत आहे. बोलीभाषा समृद्ध करा, तुम्ही पीएचडी करा अथवा संशोधन करा पण बोली भाषेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष गो.तु.पाटील, प्रा.डॉ.किसन पाटील, अशोक कोतवाल, प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे, शशीकांत हिंगोणेकर, मधु पांढरे, डी.डी.पाटील, जे.के.चव्हाण, अ‍ॅड.शिवाजी सोनार, सुशीला पगारिया होत्या. जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील, सचिव डॉ.अशोक कोळी व त्यांच्या सहकाºयांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
स्वागताअध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून दिलेल्या शुभेच्छा प्रसारित करण्यात आल्या. महाजन यांनी सांगितले की, तावडी बोलीच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू.
गणेश राऊत व डॉ.स्वाती विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. एल.जी.महाजन यांच्या चित्र प्रदर्शनाचे महानोर व मान्यवरांनी उद्घाटन केले.

Web Title: Government should give support to the library and farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.