विद्यार्थी हितासाठी अभ्यासक्रमाचे धोरण शासनाने ठरवू नये - चेतन एरंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:11 PM2018-11-29T13:11:12+5:302018-11-29T13:12:17+5:30
शासनाकडून शिक्षणाचा वापर समाजाचे मत तयार करण्यासाठी होतो
जळगाव : शासनाकडून शिक्षणाचा वापर केवळ समाजाचे मत तयार करण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थी भविष्यात समाधानी राहील असे शिक्षण सध्या दिले जात नाही. त्यामुळे अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण हे शासनाने ठरवूच नये असे मत पुणे येथील ‘होमस्कुलींग’ची संकल्पना राबविणारे चेतन एरंडे यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमासाठी चेतन एरंडे हे नुकतेच शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाध साधला असता, त्यांनी ते राबवत असलेल्या ‘होमस्कुलींग’मुळे मुलांची थांबणारी घुसमट व आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर असलेल्या अडचणी बाबत एरंडे यांनी माहिती दिली. एरंडे म्हणाले की, शासनाने शिक्षणव्यवस्थेत बदल न करता, केवळ शिक्षण चळवळीतील तज्ज्ञांना सोबत घेवून त्यांना निधी देण्याचे काम केले पाहिजे. शासनाने शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करु नये असेही एरंडे म्हणाले.
कोण आहेत चेतन एरंडे
चेतन एरंडे हे गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे ‘होमस्कुलींग’ ची संकल्पना राबवत आहेत. मुलांना शाळेत न पाठवता त्यांचा अभ्यास घरातच करून घेवून, मुलाची प्रचलित शिक्षणव्यवस्थेत होणारी घुसमट दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत:च्या मुलापासून केली आहे. त्यांच्या मते मुलाला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण घेण्याची व माणूस म्हणून त्याला मिळालेल्या क्षमता ओळखण्याची व त्या क्षमता पूर्ण ताकदीने वापरण्याची संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्या उपक्रमात पुण्यातील २५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही एरंडे यांनी सांगितले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गरजा ओळखून शिक्षण दिले जात नाही. ठराविक वेळेत निश्चित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ठराविक वेळेतच शाळेत जाणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा देणे हे निश्चित होत जाते. त्यामुळे विद्यार्थी तणावात येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या गजरा ओळखून शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत एरंडे यांनी व्यक्त केले.
डोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावा
सध्याचे शिक्षण हे सर्वसामान्यांना न पेलण्यासारखेच आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देत खासगी शाळांमध्ये विद्यार्थी घातले जात आहेत व त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे डोनेशनवर खर्च न करता त्यातून मुलांना नवीन अनुभव मिळावा यावर हा खर्च करावा. विद्यार्थ्यांना आवडणारे साहित्य, खेळावर हा खर्च करावा. तसेच ‘होमस्कुलींग’साठी पालकांनी देखील वेळ काढला पाहिंजे. घरीच अभ्यासक्रम पूर्ण करून ‘एन.आय.ओ.एस.’ या भारत सरकारच्या मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असेही एरंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.