धावडे शिवारातील तो वाळूसाठा शासनाने घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:39+5:302021-06-21T04:12:39+5:30
नांदेड, ता. धरणगाव : नारणे येथील गिरणा पात्रातील वाळू गटाचा लिलाव झालेला असताना धावडे शिवारातील एका शेतात शेकडो ब्रास ...
नांदेड, ता. धरणगाव : नारणे येथील गिरणा पात्रातील वाळू गटाचा लिलाव झालेला असताना धावडे शिवारातील एका शेतात शेकडो ब्रास वाळूचा साठा करून ठेवण्यात होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्या साठ्यावरून रात्रीच्यावेळी वाळू वाहतूक केली जात होती. याबाबत ‘लोकमत’मधून सचित्र वृत्त झळकल्यानंतर त्या वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला असून शासनाने तो ताब्यात घेतला आहे.
लवकरच साठ्यावरील शिल्लक असलेल्या वाळूचा लिलाव केला जाणार असल्याचे समजते. हा शेकडो ब्रास वाळूसाठा धावडे शिवारातील नांदेड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या एका शेतामध्ये करून ठेवण्यात आलेला होता. साठ्याबाबत मंडळ अधिकारी गवळी यांना विचारले असता, मक्तेदाराने रितसर परवानगी घेऊन साठा केला आहे, असे सांगितले होते. याबाबत २ जून रोजी ‘लोकमत’मधून ‘धावडे शिवारातील वाळूचा साठा वैध की अवैध?’ अशा मथळ्याखाली सचित्र वृत्त झळकल्यानंतर काही दिवस रात्रीची वाहतूक बंद झाली होती.
काही दिवसांनंतर पुन्हा साठ्यावरून रात्रीच्यावेळी सर्रास वाळूची वाहतूक सुरू होती. पुन्हा १६ रोजी ‘लोकमत’मधून धावडे शिवारातील वाळूसाठा रात्रीतून गायब अशा मथळ्याखाली सचित्र वृत्त झळकल्यानंतर महसूल विभागाने दखल घेतली. सावखेडा तलाठी सतीश शिंदे यांनी शिल्लक असलेल्या वाळूचा पंचनामा केला असून रात्रीला चोरट्या वाहतुकीस आळा घालण्यासाठी तलाठ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या साठ्यावर शिल्लक असलेल्या वाळूचा लिलाव करण्यात येणार असल्याचे समजते.
===Photopath===
200621\20jal_7_20062021_12.jpg~200621\20jal_8_20062021_12.jpg
===Caption===
धावडे शिवारातील हाच तो शिल्लक असलेला वाळूचा साठा व याबाबत लोकमतमधून प्रसिद्ध झालेले वृत्त.~धावडे शिवारातील हाच तो शिल्लक असलेला वाळूचा साठा व याबाबत लोकमतमधून प्रसिद्ध झालेले वृत्त.