फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हे सरकारचे दुर्देव – सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 06:03 PM2018-02-19T18:03:32+5:302018-02-19T18:03:44+5:30
जाहिरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते. परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहिरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली.
जळगाव ( अमळनेर ): जाहिरात ही फक्त शाम्पू आणि साबणाची केली जाते. परंतु सध्याचे सरकार स्वत:चीच जास्त जाहिरात करत आहे. या फसव्या जाहिराती सातत्याने कराव्या लागतात हेच सरकारचे दुर्देव आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत केली.
हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवसातील तेरावी सभा अमळनेर येथे मोठया प्रतिसादात पार पडली. धुळे जिल्हयातून जळगाव हद्दीमध्ये प्रवेश करताच भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी तरुणांचा उत्साह बघता तरुणाची बुलेट चालवत सहभाग नोंदवला.
स्वच्छ अभियान हे संत गाडगेबाबांनी पहिल्यांदा सुरु केले आणि त्यानंतर महाराष्ट्रात स्वच्छता अभियान कुणी सुरु केले असेल तर ते स्वर्गीय आबांनी. मात्र आता स्वच्छ भारत अभियान सुरु करुन मोदी स्वतं: क्रेडीट घेत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.
दरम्यान, मुंबईत पार पडलेल्या मॅग्नेटिक कार्यक्रमावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमावर किती खर्च सरकारने केला आहे. कारण हा खर्च केलेला पैसा सर्वसामान्य जनतेचा असल्याने त्याची माहिती माहितीच्या अधिकारात घेणार असल्याचेही जाहीर केले.
योजना सुरु करायच्या आणि अंमलबजावणीच्या नावाने बोंबा – सुनिल तटकरे
शाश्वत शेती, मेक इन महाराष्ट्र, स्टँड अप इंडिया आणि आता मॅग्नेटिक महाराष्ट्र अशी जड नावं देवून योजना चालू करायच्या मात्र त्याची अंमलबजावणी कधीच होताना दिसत नाही.त्याच्या नावाने बोंबा सुरु आहेत. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत ८ लाख कोटींची गुंतवणूक होणार होती ?यापैकी किती गुंतवणूक आली असा सवाल प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अमळनेरच्या जाहीर सभेत सरकारला विचारला.
दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार दिले जातील. यापैकी किती तरुणांना रोजगार मिळाला? हा प्रश्न आम्ही प्रत्येक सभेत विचारत आहोत. अद्याप एकही तरुण भेटलेला नाही ज्याला या सराकरच्या धोरणामुळे रोजगार मिळाला. जळगाव जिल्हा फळबाग पिकवणारा परिसर आहे. मागे जळगावत गारपीट झाली असताना पवार साहेबांनी कृषीमंत्री असताना तात्काळ मदत केली होती.पण मागच्या चार वर्षात जळगावला काहीच मदत मिळाली नाही असा आरोपही तटकरे यांनी केला. सभेमध्ये जळगाव जिल्हयाचे प्रभारी दिलीप वळसेपाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार गतिमान कारभाराचे पुरस्कार घेत आहे. परंतु सरकारचा गतिमान कारभार असताना धर्मा पाटील या शेतकऱ्याला आपल्या न्याय्य मागणीसाठी आत्महत्या का करावी लागली असा जाहीर सवाल दिलीप वळसेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
सभेच्या सुरुवातीला छत्रपतीशिवाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सभास्थळी असलेल्या अर्धाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर गॅसचे वाढलेले दर याचा निषेध म्हणून पुन्हा एकदा महिला चुलीवर आल्या असल्याचे दाखवणासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते चुल पेटवण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांचं औजार असलेल्या नांगराचेही पूजन करण्यात आले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि जळगाव जिल्हयाचे प्रभारी दिलीप वळसेपाटील,माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री भास्कर जाधव,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,माजी मंत्री गुलाबराव देवकर,युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,आमदार जयदेव गायकवाड,आमदार सतिश पाटील, नेते अनिल पाटील,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक,माजी आमदार अमृत पाटील,माजी आमदार राजेश देशमुख,महिला अध्यक्षा कल्पना पाटील,सुरेखा ठाकरे,तिलोत्तमा पाटील,मंगला पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.