भरमसाठ खरेदी केलेली तूर खपवण्यासाठी शासनाची शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 07:46 PM2018-05-06T19:46:15+5:302018-05-06T19:46:15+5:30
कार्ड नसलेल्यांनाही रेशन दुकानावर मिळणार ‘अनलिमिटेड’ डाळ
जळगाव : शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी मागील वर्षी (२०१६-१७ मध्ये) नाफेडच्या केंद्रांच्या खरेदीनंतरही उरलेली सुमारे २५ लाख क्विंटल तूर शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत प्रथमच स्वत: खरेदी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेल्या तूरीचे करायचे काय? असा प्रश्न शासनाला पडला आहे. त्यामुळे ही तूर खराब होण्यापूर्वीच त्याची डाळ करून ती रेशन दुकान, मॉल्समधून बाजारभावापेक्षा कमी म्हणजे ५५ रूपये किलो प्रमाणे विकण्याची शक्कल शासनाने लढवली आहे.
तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने रेशनदुकानदारांना यातील कमिशन वाढवून देत ते प्रतिकिलो ३ रूपये करण्यात आले आहे.
२०१६-१७ मध्ये जिल्ह्यात झालीय १ लाख ३२ हजार क्विंटल तूर खरेदी
तुरीची लागवड वाढल्याने २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत ९ केंद्रांवर ५ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे एकूण १ लाख ३२ हजार ७६३ क्विंटल तूर खरेदी झाली होती. त्यात जळगाव केंद्रावर ३७७१ क्विंटल, जामनेर २७ हजार ५०४.३० क्विंटल, बोदवड २७ हजार ८१४.५० क्विटल, मुक्ताईनगर ३२ हजार १७०.५०, रावेर १३६०१, चोपडा २७८३, पाचोरा ९५१९.५०, अमळनेर ७७६३, चाळीसगाव ७८६६.५० क्विटल याप्रमाणे खरेदी झाली होती. मात्र त्यावेळी व्यापाºयांनी आधीच शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून नंतर शासनाच्या हमीभाव केंद्रावर जादा भावाने विक्री केल्याच्या तक्रारी आल्याने या तूरखरेदी घोटाळ्याची चौकशीही झाली होती. त्यामुळे २०१७-१८ मध्ये शासनाने या खरेदी केंद्राचे निकष कडक केले. आॅनलाईन नोंदणी सक्तीची केली.
२०१७-१८ मध्ये सुमारे ५२ हजार क्विंटल तुर खरेदी
२०१७-१८ मध्ये मात्र नाफेडच्या केंद्रांवरच सुमारे ९ हजार शेतकºयांनी तुरीची नोंदणी केली असून आतापर्यंत ६०हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. अजून २५ हजार क्विंटल तूर खरेदी होण्याची शक्यता आहे. नाफेडच्या केंद्रांची मुदतही शासनाने वाढवून १५ मे पर्यंत केली आहे. तरीही तूर शिल्लक राहिली तर मागील वर्षीप्रमाणे शासन स्वत: तूर खरेदीचा निर्णय घेऊ शकते. मात्र सध्यातरी तशी आवश्यकता नसल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी झाली होती ७० लाख क्विंटल तूर खरेदी
२०१६-१७ मध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले होते. नाफेडच्या केंद्रांवर तसेच शासनामार्फत मिळून राज्यभरातून सुमारे ७० लाख क्विंटल तूर खरेदी झाली. त्यात राज्य शासनाने प्रथमच २५ लाख क्विंटल तूर खरेदी केली.
३ महिन्यांपासून रेशन दुकानांवर विक्री
मोठा निधी खर्चून खरेदी केलेली ही तूर गोडावूनमध्ये पडून राहिल्यास खराब होण्याची भिती असल्याने शासनाने या तुरीची डाळ करून विक्रीचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार या तुरीची डाळ करून ती १ किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांमार्फत मागणी नोंदविल्यानंतर मागणीनुसार डाळीचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यात ५ हजार ८०० क्विंटल डाळीची मागणी जिल्हा पुरवठा विभागातर्फे नोंदविण्यात आली होती. त्यानुसार डाळीचा साठा रेशनदुकानांवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र रेशनकार्ड नसलेल्यांनाही केवळ ५५ रूपये किलो दराने कितीही डाळ खरेदी करता येणार असल्याची माहितीच लोकांपर्यंत न पोहोचल्याने यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
कमिशनमध्ये वाढ; मॉलमध्येही उपलब्ध करून देणार
शासनाला या योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करीत प्रतिकिलो ३ रूपये करण्यात आले आहे. तसेच मॉलमध्येही ही डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेशन दुकानांवरही रेशन कार्ड नसलेल्यांनाही ही डाळ कितीही प्रमाणात खरेदी करता येणार आहे.
बाजारभावापेक्षा कमी भाव
बाजारात सध्या तूरडाळ ५८ ते ६२ रूपये किलो दराने उपलब्ध आहे. मात्र शासनाकडून रेशनदुकानांवर ही डाळ ५५ रूपये किलो या द राने उपलब्ध करून देण्यात आली आहे.