राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली जैन उद्योग समूहातील विविध प्रकल्पांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:16 PM2017-12-20T16:16:36+5:302017-12-20T16:17:29+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज जळगाव येथील जैन उद्योग समूहास भेट देत जैन उद्योग समूहातील विविध प्रकल्पांची पाहणी केली.
जळगाव - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज जळगाव येथील जैन उद्योग समूहास भेट देत जैन उद्योग समूहातील विविध प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन, अतुल जैन, अजित जैन यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सकाळी जैन हिल्स येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी गोल्फ कारमधून प्रवास करीत जैन हिल्स मधील विविध उपक्रमांची पाहणी केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ऊती संवर्धन प्रयोग शाळेस (टीश्यू कल्चर लॅब) भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. जैन बंधूंसह टीश्यू कल्चर ॲण्ड ॲग्रीकल्चर सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील, डॉ. अनिल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केळीच्या टीश्यू कल्चर रोपांची निर्मितीसह डाळिंब, पेरू, स्ट्रॉबेरी, नारळाच्या टीश्यू कल्चर रोपांच्या निर्मिती तंत्राबाबत मा. राज्यपाल महोदयांना माहिती दिली.
त्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाऊंची सृष्टी स्थळाला भेट दिली. या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सुरू असलेला भात लागवड प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, सीताफळ लागवड क्षेत्र, सोलर वॉटर पंप, आंबा व उष्णकटिबंधांमध्ये उत्पादित होणाऱ्या फळांवर आधारीत प्रक्रिया प्रकल्पास भेट देवून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच कृषी जलच्या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथेही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भेट दिली. तेथील स्वयंसेवकांनी त्यांना गांधी तीर्थाची सविस्तर माहिती दिली. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलूभाऊ जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा खादीचा पंचा, सुताचा हार, गांधी जीवनावर आधारीत पुस्तके व महात्मा गांधीजींचा पुतळा देवून सत्कार केला. तसेच महामहीम राज्यपाल महोदयांनी प्रस्तावीत जल विद्यापीठाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास राज्यपाल महोदय यांनी जळगाव येथील विमानतळावरुन यवतमाळकडे प्रयाण केले.