मुलीची शप्पथ तुम्हाला राज्यपाल करणार...खडसेंचा गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:14 PM2020-09-12T17:14:24+5:302020-09-12T17:16:30+5:30
‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळ अधिवेशनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची आॅफर दिली होती. माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, ‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी आम्ही दोघेच अँटी चेंबरला होतो. त्यांनी मला राज्यपालपदाची आॅफर दिली होती. मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचं फडणविसांनी म्हटलं होतं, असं खडसे यांनी शनिवारी हा गौप्यस्फोट केल,. तर एका वृत्त वाहिनीवरही सांगितले.
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. तेही झालं नाही. त्यानंतर परत विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं असे सांगितले, जी नावे दिली ती वगळून दुसरीच चार नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका.
कालच खडसें आमचे नेते आहेत, त्यांच्यावर काही बोलणार नाही, असे सांगत मी घरातील भांडी रस्त्यावर धुत नाही, असे सांगून खडसेंना टोला लगावला होता तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यावरही खडसे यांनी देवेंद्र फडणवीस हे चांगले ड्रायक्लिनर असल्याचा पुनरुच्चार केला होता. परत आज खडसेंनी फडणविसांवर हल्लाबोल केला.