गोवी भ्रमरा सुमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:50 PM2018-10-05T15:50:01+5:302018-10-05T15:50:49+5:30
‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘रविवार विशेष’मध्ये ‘गाव पांढरी’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक रवींद्र पांढरे...
कुटुंब व समाज व्यवस्थेच्या घट्ट विणीच्या वस्त्राची विण काहीशी सैल... विरळ होत चाललीय. त्यामुळेच माणसं सामाजिक दृष्ट्या विमनस्क होता आहेत का? हा संशोधनाचा विषय ठरावा.
पूर्वीच्या काळी सणाउत्सवाच्या, लग्न समारंभाच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र आले म्हणजे वधू-वर संशोधन ही पार पडत असे. समाजात अशा काही ठराविक व्यक्ती वधू-वर संशोधनात अग्रेसर असत. समाजातील बहुतेक विवाह त्यांच्या माध्यमातूनच जळून येत असत. अशा वल्ली समाजामध्ये अजून ही आहेतच नाही असे नाही. पण आताशा वधू-वर संशोधन मंडळे, वधू-वर परिचय मेळावे व्हायला लागल्यामुळे अशा व्यक्ती वल्लीचं काम काहीसं हलंक झालं आहे. नाही तर या वल्ली घरी कमी अन् समाजात गावोगावी फिरतानाच अधिक दिसायच्या. वर्तमानपत्रात येणाऱ्या वधू-वर संशोधनाच्या जाहिराती पाहिल्या तर वधू अथवा वर समाजातलाच (जातीतलाच) पाहिजे असा आग्रह आता फारसा दिसत नाही. पण हे देखील तेवढेच खरे की अशा जाहिरातीमधील वधू-वरांचे वय बहुधा अठ्ठावीस-तीस वर्षाच्याच घरातले असते. वय जास्त वाढल्यामुळेच या वधू-वरांची आंतरजातीय विवाह करण्याची मानसिकता तयार झालेली असते, असे म्हणता येईल का?
पूर्वीच्या काळी मुलीसाठी वर शोधणं हे मुलीच्या बापासाठी मोठं जिकरीचं असायचं. मुलीसाठी वर शोधून शोधून मुलीच्या बापाचे जोडे झिजायचे म्हणे. मुुलगी १५-१६ वर्षाची झाली म्हणजे ही उपवर मुलगी मुलीच्या आई-बापाला जोखिम वाटायची. अशा उपवर मुलीच्या आई-बापाला रात्रीची झोप लागायची नाही. केव्हा एकदा मुलीचं लग्न लावून देतो, लग्न लाऊन देऊ तिला सासरी वाटी लावतो आणि सामाजिक जबाबदारीतून मुक्त होतो असं त्यांना होऊन जायचं. आता मुलगी २५-३० वर्षाची झाली तरी योग्य स्थळाची वाट पाहण्याइतके मुलीचे आई-बाप संयमी झाले आहेत. एक काळ असा होता की ‘वर’ संशोधनात मुलीच्या बापाचे जोडे झिजायचे आता ‘वधू’ शोधायची तर मुलाच्या बापाचे जोडे झिजायला लागले आहेत. वर बापापेक्षा वधू पित्याचा भाव आता वधारलाय. मुलीला मागणी घालायला आलेल्या वरबापाला आता वधू पिता सहज विचारतो, ‘मुलगा नोकरीला आहे का?’ नोकरी सरकारी आहे का? खाजगी? शेती किती आहे? घरी संडास आहे की नाही? बहुतेक वधू पित्यांचा कल सरकारी नोकरी असलेल्या मुलालाच जावई करून घेण्याकडे असतो.
केवळ शेतीत राबणाºया, श्रमणाºया व केवळ शेती उत्पादनावर अवलंबून असणाºया वराला तर आताच्या काळात वधू मिळणं फारच अवघड झालयं. वधू पित्याची अग्रक्रमाने पसंती सरकारी नोकरी असणाºया मुलांना असल्याने समाजात खूप सारी मुलं २५-३० वर्षाची झाल्यावर ही अविवाहितच असल्याचं दिसतंय. याच प्रमुख कारण अर्थातच मुलींचा घटलेला जन्मदर.
मुलींचा जन्मदर का घटला, तर बहुतेक जोडप्यांना आता दोन पेक्षा जास्त अपत्य नको आहेत. मग वंश परंपरा चालवायची तर दोन अपत्यापैकी एक तरी मुलगा हवाचं. त्यामुळे जर पहिलं अपत्य मुलगी असेल तर नंतरचे मुलींचे गर्भ सर्रास पाडून टाकले जातात. मुली नकोशा झाल्या म्हणून मुलींचे गर्भ पाडले जातात हे पूर्ण सत्य नाही. असे असले तरी काही ही कारणाने का होईना मुलींचा जन्मदर घटला आहे हे आजचे वास्तव आहे. मुलींचा जन्मदर घटल्यामुळेच सामाजिक लग्न व्यवस्था काहीशी अडचणीत आली आहे.
लग्नाचं वय उलटून गेल्यावरही वधू मिळत नाही म्हणून किंवा खूप-खूप शोध घेऊन ही समाजातंर्गत अनुरुप वधू किंवा वर मिळत नाही म्हणून समाज मन अलिकडे आंतरजातीय विवाहाकडे वळताना दिसते आहे. जात, धर्म, पंथ याचा विचार न करता लग्नाळू वयाची खूप मुलं-मुली परस्पर लग्न करत असल्याचे प्रकार ही वाढले आहे. लिव्ह इन रिलेशनशीप हा नवीनच लग्न प्रकार ही समाज मान्य होताना दिसतोयं. याला वय हेच एक कारण आहे असे नाही तर बदलते सामाजिक पर्यावरण ही तेवढेच जबाबदार आहे.
विशेषत्वाने नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे नैतिकता व घराण्याची प्रतिष्ठा याची धार आता पूर्वी इतकी तिक्ष्ण राहिली नाही ती बरीचशी बोथट झाली आहे. शेवटी माणूस हा समुहात वावरणारा, समूह करून राहणारा समाजप्रिय प्राणी आहे. कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्था माणसाला मानसिक आधार देते. संकट काळात, दु:खात कोलमडून न पडता धीराने उभं राहण्याच, संकटाला, दु:खाला सामोरं जाण्याचं बळ देते. जाती अंताच्या संघर्षास आंतरजातीय विवाह पूरक असले तरी त्यामुळे समाज व्यवस्था विस्कळीत होतेयं हे देखील नाकरून चालणार नाही. अर्थात कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतातच एक डावी आणि दुसरी उजवी. नाही तरी आपण म्हणतच असतो, ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ आपण काय कमावतोय आणि काय गमावतोय हे पुढे येणारा काळच ठरवेल. कालचक्र नाही तरी पुढे नेऊनच फिरत राहणार.
-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर