ग्रा.पं. निवडणुकीत कोरोना लक्षणे असल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:09+5:302021-01-10T04:13:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून १५ जानेवारी रोजी यासाठी ...

G.P. Officers, staff test if corona symptoms in the election | ग्रा.पं. निवडणुकीत कोरोना लक्षणे असल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणी

ग्रा.पं. निवडणुकीत कोरोना लक्षणे असल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जात आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची सरसकट कोरोना चाचणी केली जात नसली तर ज्यांना लक्षणे आढळली त्यांना तपासणी करावी लागणार आहे. दरम्यान, या पूर्वी जे क्वारंटाईन होते, अशा व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.

कोरोनामुळे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणीही महत्त्वाची ठरणार आहे.

९३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड

तालुक्यातील ४३ पैकी २ ग्रामपंचायची बिनविरोध ठरल्या असून ४१ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यासाठी ९६५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ५९ जण बिनविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १७० मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी ८५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून १० टक्के राखीव मनुष्यबळ ठेवण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जातेय काळजी

ज्या कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलल्या गेल्या होत्या, त्या कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीदरम्यान प्रशासनाच्यावतीने काळजी घेतली जात आहे. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, त्यांना लक्षणे असल्याच्या अद्याप तक्रारी नाही. मात्र ज्यांना लक्षणे आढळल्यास तपासणी होईल. यामध्ये कोणताही धोका पत्करणार नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: G.P. Officers, staff test if corona symptoms in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.