ममुराबादच्या ग्रामपंचायतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:07+5:302021-03-14T04:16:07+5:30
सदस्याची तक्रार : पदावरून कमी करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीत एका पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची नियुक्ती सध्या ...
सदस्याची तक्रार : पदावरून कमी करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीत एका पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची नियुक्ती सध्या क्लार्क पदावर करण्यात आली आहे. सदरची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप करून संबंधितास तातडीने त्या पदावरून कमी करावे, अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत सदस्या प्रीतम ज्ञानेश्वर पाटील यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.
ग्रामपंचायतीने पदभरती करताना संबंधित कर्मचाऱ्याची पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती. परंतु, सदर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून क्लार्क पदावर काम करीत आहे. जर कर्मचारीच नियमबाह्य पद्धतीने काम करीत असतील तर ग्रामपंचायतीत किती नियमबाह्य कामे चालत असतील, असा प्रश्न प्रीतम पाटील यांनी उपस्थित केला आहे. सदर कर्मचाऱ्याने पाणीपुरवठा पदाऐवजी क्लार्क पदाचेच वेतन आजपर्यंत घेतले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ग्रामपंचायतीची आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती तत्काळ पाणीपुरवठा विभागात करण्यात यावी आणि जेवढी जास्तीची रक्कम त्यांना वेतनाद्वारे दिली आहे, ती वसूल करावी. सदर कर्मचाऱ्याने शासनाची व ग्रामपंचायतीचीही फसवणूक केली असून त्यावर ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत कारवाई करावी. त्याला क्लार्क पदावरून कमी करून ज्या पदावर भरती केले आहे, त्या पदावर नियुक्त करावे. तसे न झाल्यास सरपंच व ग्रामसेवक या पदांचा दुरुपयोग करीत असल्याचे गृहीत धरून त्यांच्यावर अपात्रतेची व शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.