जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 04:34 PM2017-12-22T16:34:16+5:302017-12-22T16:42:26+5:30
आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्यासोबत घेतली बैठक
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२१ : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांच्याबाबतीत समस्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरपूर अधिवेशना दरम्यान आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संबंधित विभागाची आढावा बैठकीत म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन ग्रामीण रुग्णालय करणे, अद्यावत रुग्णवाहिका, जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्र व १११ उपकेंद्र स्थापन करण्याबाबतच्या बृहद आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांबाबत २० रोजी नागपुर येथे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सांवत यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य संचालक प्रदीप पवार, सह संचालक बी. डी. पवार, नाशिकच्या उपसंचालक ए. आर. घोडके, जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक एन.एच. चव्हाण, जळगाव जि.प.च्या जिल्हा आरोग्य अधिकारी बी.एस. कमलापुरकर उपस्थित होते.
म्हसावदला होणार ग्रामीण रुग्णालय
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामिण रूग्णालय मंजुर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य उपसंचालक नाशिक यांच्या मार्फत आरोग्य संचालक व प्रधान सचिवांकडे सादर केला होता. तसेच मुसळी फाट्यापासून ते जळगांव राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वाढत्या अपघातामुळे अद्यावत रूग्णवाहिका (१०८) पाळधी येथे उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना केली.
धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला मिळणार डॉक्टर
धरणगांव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेवून आरोग्यमंत्र्यांनी धरणगांव ग्रामीण रूग्णालयात वर्ग -१ चे तीन वैद्यकीय अधिकारी नियुक्तीचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी वर्ग -१ चे मंजुर असलेल्या ३७ पैकी ३० पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची १२३ मंजुर पदांपैकी ३० पदे रिक्त तर २५ वैद्यकिय अधिकारी सतत गैरहजर असतात तर गट - क वर्गाचे ६७७ पदापैकी १३९ तर गट ड वर्गाचे ३८० पैकी ८९ पदे रिक्त आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी रूग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने शासनाच्या योजनांचा व रूग्ण सेवेचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण पडत आहे. या गंभीर विषयावर देखील सविस्तर चर्चा होवून लवकरच निर्णय घेवू असे ठोस आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.
माता व बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या ६ एकरचा परिसरात अनधिकृत घरे होती. प्रशासनाने ही अतिक्रमणे काढून टाकली आहेत. या खुल्या जागेवर माता व बालकांसाठी स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (संदर्भ रूग्णालय ) तसेच वर्ग - ४ कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. लहान मुलांसाठी आयसीयु बेडचाही प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश करण्यात आले.
९ प्राथमिक आरोग्य केंद्र व १११ उपकेंद्र
सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारीत जिल्ह्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र व १११ उपकेंद्र स्थापनेबाबतच्या आराखड्यास मान्यता देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी गुलाबराव पाटील हे स्वत: पाठपुरावा करत आहेत. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. यात जळगांव ग्रामीण मतदार संघात १७ उपकेंद्र व ३ प्रा.आ.केंद्र नव्याने मंजुर करण्यात येणार आहेत. तसेच उपजिल्हा रूग्णालय जामनेर, ग्रामीण रूग्णालय पहुर, रावेर, पाचोरा, भडगांव व अमळनेर येथे ३० खाटांवरून ५० खाटांचे श्रेणीवर्धन करणे आणि प्रा.आ.केंद्र शिरसोदे , नेरी, फत्तेपुर व फैजपुर येथे देखील ग्रामीण रूग्णालय मंजुर करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.