माहिती न दिल्यामुळे ग्रामसेवकास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:57 PM2019-07-14T18:57:25+5:302019-07-14T18:58:34+5:30
चाळीसगाव: माहिती आयोग खंडपीठाचा आदेश
चाळीसगाव : माहितीच्या अधिकारात विचारलेली माहिती पुरविली नाही म्हणून उपखेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व जनमाहिती अधिकारी चंद्रकांत मुरलीधर मराठे यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची कार्यवाही करण्याचा आदेश राज्य माहिती आयोगाचे नाशिक खंडपीठ आयुक्त बिश्नोई यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद प्रल्हाद पाटील (रा.उपखेड ता.चाळीसगाव) यांनी उपखेड ग्रामपंचायतीच्या बाबतीत माहितीचा अधिकार अन्वये तत्कालीन ग्रामवसेवक तथा जनमाहिती अधिकारी चंद्रकांत मराठे यांना माहिती विचारली होती. ही माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळा केली होती. म्हणून पाटील यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांचेकडे तक्रार केली होती. त्यांनी अपिलार्थी विनोद पाटील यांना माहिती देण्यास ग्रामसेवक यांना सांगितले होते. त्यानंतरही ग्रामसेवक मराठे यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पाटील यांनी माहिती आयोग नाशिक खंडपीठाकडे अपिल दाखल केले होते. आयोगाने ग्रामसेवक चंद्रकांत मराठे यांचे म्हणणे अमान्य करुन त्यांच्यावर अधिनियमातील कलम २० (१) नुसार त्यांच्यावर एक हजार रुपये दंडाची (शास्तीची) कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम ग्रामसेवक मराठे यांच्या वेतनातून कपात करुन त्याबाबतची माहिती आयोगाला कळविण्या बाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.