आजीच्या बटव्यातील धैर्याने नातवांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:18 PM2020-08-10T12:18:19+5:302020-08-10T12:19:07+5:30
आभाळाऐवढी माया: वृद्धेने नातवांसह कोरोनाचा लढा जिंकला, नातवांसाठी केला क्वारंटाईन सेंटरला मुक्काम
जळगाव : नातवंडे छोटी असल्याने कोरोनाच्या संकटात एकटी कशी राहतील, या चिंतेने ६३ वर्षीय आजी दहा दिवसाच्या कोरोनामुक्ती नंतरही तीन दिवस कोविड केअर सेंटरमध्ये मुक्कामी राहिल्या व नातवांसोबत कोरोनाशी लढा देत त्या सुखरूप घरी घेऊन आल्या़़़ जळगावातील कोविड केअर सेंटरमधील कोरोनाला हरविणाऱ्या आजी व नातवाची ही कहाणी़़़
ममुराबाद ता़ जळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ६३ वर्षी वृद्धेला ताप येत होता़ सतत येणारा ताप यामुळे खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले़ एक्सरे काढला यात न्यूमोनियाची लक्षणे जाणवली डॉक्टरने सांगितल्यानुसार कुटुंबियांनी तातडीने जळगाव शासकीय तंत्रनिकेतनला महाविद्यालयात जावून तपासणी करून घेतली व त्यात या आजी कोरोना बाधित आढळून आल्या़ २८ जुलै रोजी त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले़ यानंतर संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी झाली़ यात १६ वर्षीय व १० वर्षीय असे दोघे नातवंडे ३० जुलै रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले़ त्यांनाही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले़
नातवांना दिले बळ
६ जुलैला आजीच्या उपचाराचे दहा दिवस पूर्ण झाले़ मात्र, नातवांच्या उपचाराचे तीन दिवस बाकी होते़ त्यामुळे आपण जरी बरे झालेलो असलो तरी नातवांना एकटे सोडणार नाही, ते कसे राहतील, ही चिंता मनात घेऊन, आजीबार्इंनी तेथील डॉक्टरांना विनंती केली. आजीचा हट्ट आणि नातवांबद्दलची ओढ पाहून अखेर कोरोनामुक्तीनंतरही डॉक्टरांनी त्यांना नातवांजवळ राहण्याची परवानगी दिली. आजीनेही मोठ्या आनंदात तीन दिवस या नातवांसोबत घालविले. आजीमुळे नातवांना कोरोनाशी लढण्याचे मोठे बळ मिळाले व रविवारी ९ रोजी तिघेही बरे होऊन घरी परतले़
घाबरून नका तुम्ही बरे व्हाल: आजीचा संदेश
कोरोना झाल्यानंतर अनेक जण नैराश्यात जातात, भितात मात्र, घाबरण्यासारखा हा आजार नाही़ लवकर दवाखान्यात जर आले तर तुम्ही यातून बरे होऊन घरी सुखरूप घरी जावू शकतात़ मी मुळीच घाबरले नाही म्हणून आज सुरखरूप घरी जावू शकले, नातवांना धिर देऊ शकले, असा संदेश कोरोनामुक्त झालेल्या या ६३ वर्षीय आजींनी दिला आहे़ कोविड सेंटरला सर्व सुविधा चांगल्या होत्या़ असेही त्यांनी सांगितले़