आजोबा, वडिलांकडून सहकाराचा घेतला वारसा - भालचंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:17 PM2018-12-16T12:17:10+5:302018-12-16T12:18:24+5:30
जळगाव पीपल्स सहकारी बँकेत आता चौथी पिढी कार्यरत
सुशील देवकर
मन्य जनतेची सावकारी पाशातून सुटका करून त्यांची आर्थिक पिळवणूक थांबविणे, त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या दि जळगाव पीपल्स को-आॅप बँकेचे चेअरमनपद भूषविलेल्या रामदास लहानू पाटील या आजोबांकडून तसेच त्यानंतर बँकेची धुरा वसा म्हणून सांभाळणाऱ्या काका यशवंतराव, वडिल भालचंद्र पाटील यांच्याकडून सहकाराचा वारसा घेत बँकेचे विद्यमान चेअरमन भालचंद्र पाटील हे वाटचाल करीत आहेत. आता पाटील घराण्यातील चौथी पिढी अनिकेत भालचंद्र पाटील हे देखील सहकाराच्या दिंडीत सहभागी झाले आहे.
याबाबत भालचंद्र पाटील यांनी सांगितले की, जळगाव पीपल्स बँकेची स्थापना २३ डिसेंबर १९३३ रोजी आजोबा कै.रामदास लहानू पाटील यांनी केली. ते २८ सप्टेंबर १९४७ ला चेअरमन झाले. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकींगचेच नव्हे तर सहकारातील प्रगतीचे नवे पर्व सुरू झाले. त्यांच्या शब्दाखातर सामान्य माणूस बँकेत ठेव ठेवत होता. फक्त बँक हेच त्यांचे कार्यक्षेत्र नव्हते तर ते तत्कालीन मुंबई सरकारच्या कायदे मंडळाचे सदस्यही होते. म्हणजेच आजचे आमदार होते.
शहरातील बहुतांशी धार्मिक, सामाजिक कार्यात ते अग्रणी होते. त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीत जळगावातील काही धनाढ्य शक्तींनी एकत्र येऊन त्यांच्या पॅनल विरूद्ध पॅनल उभे केले. मात्र समाजाने त्यांचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. सभासदांनी पाटील घराण्यानेच बँकेच्या चेअरमनपदाचा पदभार पहावा, अशी आग्रही भूमिका वारंवार घेतली.
वारसा पुढच्या पिढीकडे
पाटील कुटुंबातील सहकाराचा हा वारसा आता पुढच्या चौथ्या पिढीकडे सोपविला आहे. भालचंद्र पाटील यांचे चिरंजीव अनिकेत यांना सभासदांच्या आग्रहावरून बँकेचे संचालक करण्यात आले आहे.
स्वत:चा व्यवसाय सांभाळून सहकाराचा वसा
बँकेचे विद्यमान चेअरमन भालचंद्र पाटील हे केमिकल इंजिनियर असून यशस्वी उद्योजकही आहेत. आजोंबाप्रमाणे वडिलांनी दिलेले संस्कार यामुळे स्वत:चे शैक्षणिक करीअर आणि चारित्र्य याचे संवर्धन करू शकतो. मी स्वावलंबी व उद्यमशिल होण्यास त्यांचा मोठा वाटा असल्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले. ५ जून २००६ रोजी बँकेचे चेअरमनपद स्विकारत सहकाराचा वसा घेतला. माझे दोन पितृतुल्य मार्गदर्शक कै.बाबुशेठ चौबे आणि जयंतीभाई दोशी या दोघांनी मला घडविले. वडिलांची माया दिली. या प्रवासात आईने, पत्नीने तसेच लहान भावानेही साथ दिली. त्याच बळावर सहकाराचा वारसा पुढे नेण्यात यशस्वी झालो.
८५ वर्ष नफा मिळविणारी एकमेव बँक
बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सचोटीने व्यवहार केल्याने आज बँकेचा एकूण व्यवसाय २७४० कोटी इतका झाला आहे. गेल्या ८५ वर्षांपासूनसतत नफा मिळविणारी जळगाव पीपल्स बँक ही महाराष्टÑातील एकमेव बँक असावी. बँकेच्या ४० शाखांपैकी १४ शाखा स्व-मालकीच्या जागेत आहेत. बँकेची प्रगती साधण्यात यश आल्यानेच भालचंद्र पाटील यांना अखिल भारतीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट बँक चेअरमन हा पुरस्कार मिळाला. तसेच दिव्यांगांसाठी विशेष कार्य करणारी बँक म्हणून राष्टÑपतींच्या हस्ते गौरव झाला.
मी जरी आज गेली १६ वर्ष बँकेचा चेअरमन असलो तरी त्यात माझे कर्तृत्व फार थोडे आहे. कारण मला हा वारसा माझे वडील कै.प्रभाकर पाटील आणि आजोबा सहकारातले ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कै.रामदास लहानू पाटील यांच्याकडून मिळाला आहे. शिस्तबद्ध संचालक मंडळ, भविष्याचा वेध घेत कार्पोरेट पद्धतीने कार्य करणारे व्यवस्थापन, प्रामाणिक कर्मचारी वर्ग, सभासद, ठेवीदार यांच्या सहकार्याच्या बळावर बँकेच्या प्रगतीची घौडदौड कायम ठेवण्यात यश आले.
-भालचंद्र पाटील, चेअरमन, दि जळगाव पिपल्स को-आॅप. बँक लि.