आजीबाईंचा बटवा आणि कोरोना ला हटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:08+5:302021-05-24T04:15:08+5:30

स्टार ७४४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संक्रमण काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पाले भाज्या, घरातील मसाल्यातील पदार्थ ...

Grandma's wallet and delete Corona! | आजीबाईंचा बटवा आणि कोरोना ला हटवा!

आजीबाईंचा बटवा आणि कोरोना ला हटवा!

Next

स्टार ७४४

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संक्रमण काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पाले भाज्या, घरातील मसाल्यातील पदार्थ तसेच औषधी वनस्पतींचे सेवन करण्याचा वैद्यकीय सल्ला सर्वांनाच दिला जात आहे. दुसरीकडे आजीबाईच्या बटव्याचा उपयोग करून या घटक पदार्थांचे प्रमाण वाढविले जात आहे. रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा किंवा कडक उन्हाळ्यात ''क'' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात लागते. त्यामुळे ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या लिंबांचे सेवन वाढण्यासह घरगुती पदार्थांचा उपयोग कोरोना पासून बचावासाठी केला जात असल्याचे घरोघरी दिसून येत आहे.

गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला त्यावेळी हा आजार नवीनच असल्याने त्याच्यावर कोणते औषध आहे व उपचार कसे करावे याविषयी वैद्यकीय क्षेत्रात देखील संभ्रम होता. हळूहळू कोरोनावर उपचार सुरू झाले. एकीकडे हे उपचार होत असताना अनेकांचा घरगुती उपचाराकडे देखील कल वाढला. त्यात आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग उद्भवल्याने यावेळी तर अनेकांनी घरीच वेगवेगळे उपचार करुन कोरोनापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तुळस, हळद, आले, पुदिना यांच्या उपयोगासह मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यावर देखील भर दिला जाऊ लागला.

या घटकांचा उपयोग करीत असताना आजीबाईच्या बटव्याचा मोठा उपयोग आता कोरोना काळात होत असल्याचे दिसून येत आहे.

कशाचा काय फायदा

हळद

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेला फायदा होतो. ती जंतुनाशक असल्याने व बारमाही उपलब्ध होत असल्याने कोरोना काळात तिचा बराच वापर केला जात आहे. हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. या सर्व आजाराच्या रुग्णांना कोरोना काळात हळदीमुळे दिलासा मिळतो.

तुळस

तुळस सर्दी-पडशावर अत्यंत गुणकारी आहे. तुळशीतील घटकांमुळे सर्दी कफपासून मुक्तता मिळते. यासोबतच तुळशी, काळीमिरी आणि खडीसाखर मिसळून घेतल्यास सर्दी बरी होते. याशिवाय तुळशीच्या सेवनाने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुळशी तापासाठी देखील उपयुक्त मानली जाते. ताप असल्यास तुळशीचे पाने, वेलची पावडर, साखर, दूध याबरोबर घेतल्यास ताप कमी होण्यास मदत होते.

आले

आले हे महत्त्वाचे मसाल्याचा घटक पदार्थ असून ते खोकला घालविण्यासाठी सेवन केले जाते. तसेच अनेक औषधांमध्ये वापरले जाते. दररोज चहामध्ये आले टाकून घेतल्यास त्याचा फायदा बाराही महिने शरीराला होत असतो. शिवाय पावसाळा, हिवाळा या काळात सर्दी असल्यास आले उपयुक्त ठरते. यासोबतच आता कोरोना काळात साधी सर्दी झाली तरी भीती निर्माण होते, त्यामुळे यापासून बचावासाठी आल्याचा उपयोग केला जात आहे.

कोरोना काळामध्ये आयुर्वेदिक घटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक जण घरगुती उपचार देखील करत असून यामध्ये हळद, तुळशी, मिठाच्या गुळण्या, यांचादेखील उपयोग कोरोना पासून बचावासाठी होऊ शकतो.

- डॉ. जयंत जहागीरदार, आयुर्वेद तज्ज्ञ

आजीबाईच्या बटव्यात काय

गेल्यावर्षी कोरोना आला तेव्हापासून आम्ही घरीच काढा करून तो दररोज सर्वांना देतो. यासाठी उकळत्या पाण्यामध्ये तुळशीचे पान, हळद, आले टाकून तयार केलेला काढा फायदेशीर ठरतो.

- शशिकला चौधरी.

सध्या तयार काढा देखील बाजारात मिळत आहे. मात्र आम्ही घरीच काढा तयार करण्यावर भर देत असतो. यासाठी काळी मिरी, सुंठ, लवंग, तुळशीचे पान यांचा उपयोग करावा.

शोभा महाजन

गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्या गुळण्या केल्यास घसा मोकळा राहतो. याशिवाय कोरोनापासून बचाव करण्यासाठी गरम पाणी प्राशन केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तुळशीचे पाने खाण्यासह आल्याचा रस देखील घ्यावा.

- हेमलता जाधव.

कोरोनाचे एकूण रुग्ण - १३७९५१

कोरोनामुक्त झालेले -१२७१६७

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ८३०६

कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण - २४७८

Web Title: Grandma's wallet and delete Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.