दादा..दुरून हायवेवरून रस आणलाय पेशंटला देऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:14+5:302021-04-25T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त रुग्णालयात येण्यास मज्जाव करण्यात आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त रुग्णालयात येण्यास मज्जाव करण्यात आला असून बाहेर बसलेल्या रुग्णांना शनिवारी बाहेर काढण्यात आले होते. गर्दी करू नका, तुम्हालाही संसर्ग होईल, असे कर्मचारी वारंवार नातेवाइकांना सांगत होते. मात्र, रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाइकांच्या विनवण्या सुरूच होत्या.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुख्य गेटमधून आत प्रवेश नाकारण्यात येत होता. अशा वेळी एका नातेवाइकांनी रुग्णांसाठी महामार्गावरून दुरून उसाचा रस आणला होता. ‘रस दुरून आणला आहे, आम्हाला पेशंटला भेटू द्या, रस देऊ द्या,’ अशा विनवण्या हे नातेवाईक करीत होते. मात्र, आम्हाला वरिष्ठांच्या सक्त सूचना असून वेळेआधी आम्ही कोणालाच सोडू शकत नाही. असे सुरक्षा रक्षक सांगत होते. अनेक नातेवाइकांनी रुग्णालयाच्या मुख्य गेटसमोर गर्दी केली होती. पूर्ण रुग्णालय परिसरात शुकशुकाट होता. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नातेवाइकांना बाहेर पाठविण्यात येत होते.
...तर तुम्ही बाधित व्हाल
रुग्णांच्या जेवणाची व अन्य व्यवस्था रुग्णालयात आहे. नातेवाइकांनी वारंवार त्यांना भेटून उगाच संसर्ग वाढवू नये, अशामुळे त्यांनाही संसर्गाचा धोका असतो. अशा स्थितीत कुटुंबेच्या कुटुंबे आमच्याकडे दाखल होत आहेत. त्यामुळे नातेवाइकांनी संयम ठेवून काळजी घ्यावी, वॉर रूममधून तपास करावा. तेथून शक्य झाल्यास व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णाशी संवाद साधावा, रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी स्वत: काही नातेवाइकांना भेटून केले.
काेविड रुग्णालयात सीसीटीव्ही बसवावेत
खाजगी कोविड रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर नातेवाइकांना प्रवेश दिला जात नाही. त्यातच रुग्णाची प्रकृती कशी आहे, तो जेवण करीत आहे किंवा नाही याबाबत नातेवाइकांना काहीच माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे खाजगीसह शासकीय कोविड रुग्णालयांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच नातेवाइकांना रुग्णांना पाहता यावे यासाठी एखाद्या रूममध्ये स्क्रीन लावावी, अशी मागणी नातेवाइकांकडून होत आहे.