खान्देशाविषयी कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:24 PM2018-12-15T12:24:13+5:302018-12-15T12:25:23+5:30

-मिलिंद कुलकर्णी जळगाव : ‘ लोकमत’च्या ४१ वर्षांच्या वाटचालीत खान्देशी जनतेने दिलखुलास प्रेम केले. ‘ लोकमत’ला आपलेसे मानले. समाजजीवनातील ...

Grateful towards Khandesh | खान्देशाविषयी कृतज्ञता

खान्देशाविषयी कृतज्ञता

Next

-मिलिंद कुलकर्णी
जळगाव : ‘लोकमत’च्या ४१ वर्षांच्या वाटचालीत खान्देशी जनतेने दिलखुलास प्रेम केले. ‘लोकमत’ला आपलेसे मानले. समाजजीवनातील प्रत्येक घटकाचे प्रतिबिंब ‘लोकमत’मध्ये उमटावे, यासाठी आग्रही भूमिका राहिली, त्याचे मन:पूर्वक स्वागत झाले. वर्तमानपत्र म्हणून बातम्या देण्याचे काम करण्यासोबतच लोकमत बालविकास मंच, लोकमत सखी मंच, युवानेक्स्ट या माध्यमातून विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केले गेले.
देशभरात प्रत्येक क्षेत्रात एक घुसळण सुरु आहे. नवनवे तंत्रज्ञान वेगाने येऊन आदळत आहे, त्याविषयी आकर्षण वाढत आहे, परंतु जुन्या गोष्टींचा मोह सोडवला जात नाही, अशी मानसिकता सामान्य माणसाची दिसून येत आहे.
खान्देशच्यादृष्टीने विचार केला तर आम्ही मुंबई-पुण्यासारखे महानगरे नाहीत आणि विदर्भ-मराठवाड्यासारखे अनुशेषाचा फटका बसलेले विभाग नाही. मुळात अभावांची चर्चा न करता संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती खान्देशी माणसामध्ये आहे. ही आव्हाने येत असताना आमच्याकडील उद्योग, व्यापार, व्यवसायांनी काय स्थित्यंतरे अनुभवली, त्यावर मात कशी केली, याचा विस्मयकारी प्रवास वाचकांना उलगडून दाखविण्याचा प्रयत्न वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्याचे ठरविले. हा प्रयत्न वाचकांनाही आवडेल, हा विश्वास आहे.
पूर्वजांनी दिलेला उद्योग, व्यापार, व्यवसायाचा वसा घेतल्यानंतर पुढच्या पिढीने काळानुरुप आणि शिक्षण-अनुभवाचा उपयोग करीत त्याला अधिक पुढे नेल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा प्रवास नितांत सुंदर आणि मानवी प्रयत्नांचा विलक्षण मिलाफ दाखविणारा आहे. त्यामुळे ही उदाहरणे केवळ त्या कुटुंबापुरती, उद्योग-व्यवसायापुरती उरत नाही, तर ती संपूर्ण समाजाची होतात. इतिहासात त्याची नोंद होते. यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. अनेक नावे असताना काही निवडक देऊ शकलो, अनेक राहून गेली, ती पुन्हा कधीतरी निश्चितच वाचकांच्या पुढे आणू याची यानिमित्ताने ग्वाही देतो.
खान्देशी माणसाच्या धडपड, कष्टकरी वृत्तीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळींनी खान्देशवर नितांत प्रेम केले. त्यामुळे जगभर, भारतभर उद्योग, व्यापाराचा विस्तार करीत असताना मातृभूमी, कर्मभूमीतच मुख्यालय ठेवण्याचा आग्रह या मंडळींनी धरला. कविता, केळी, कापूस, भरीत, सोने, पाईप, दाल अशाने ही ओळख घट्ट होत गेली. कष्ट, कर्तृत्व, अभ्यास आणि नव्याचा शोध घेण्याच्या वृत्तीमुळे ही ओळख दृढ होत गेली. दूरदृष्टी ठेवून अशी क्षेत्रे निवडली की, काळानुसार त्याची गरज होती. मग भंवरलाल जैन यांच्यासारख्या द्रष्टया उद्योजकाने ‘ठिबक सिंचना’चा मंत्र शेतकºयांना दिला. राजमल लखीचंद आणि रतनलाल बाफना यांच्या सारख्या मंडळींनी कलाकुसरीने बनविलेल्या सोने-चांदीच्या आभूषणांची भुरळ जनतेला घातली. किराणा दुकान ते मॉलसारखा प्रयोग राबविणारे कांकरिया, ट्रान्सफॉर्मरचा उद्योग मुंबईसोबतच जळगावात सुरु करणारे मधुसूदन राणे, काळ्याआईची सेवा करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणारे प्रमोद पाटील...किती मोठी परंपरा लाभली आहे खान्देशला. खरोखर अभिमानास्पद अशी कामगिरी आहे, म्हणून ‘लोकमत’ अशा नामवंतांना सलाम करते.
वर्तमानपत्र म्हणून समाजापुढील प्रश्न, समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य निष्पक्ष, निडर व परखडपणे ‘लोकमत’ यापुढेही करीत राहील. समाजातील सकारात्मक बाबींना ठळकपणे प्रसिध्दी देण्याचे कार्य अविरत सुरु राहील. वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाचकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.

Web Title: Grateful towards Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.