डॉक्टर्स डे निमित्त कृतज्ञता : जळगावात सत्काराने भारावले ज्येष्ठ डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 07:45 PM2018-07-01T19:45:58+5:302018-07-01T19:47:59+5:30
३० जणांनी केले रक्तदान
जळगाव : चार दशकांहून अधिक काळ केलेल्या रुग्णसेवेची ‘डॉक्टर्स डे’ला सत्काररुपी पावती मिळून आयएमएकडून व्यक्त करण्यात आलेल्या कृतज्ञतेने शहरातील ज्येष्ठ नागरिक भारावून गेले. वैद्यकीय क्षेत्रात इतरांना आधार देणारी ही मंडळी रविवारी झालेल्या या सोहळ््याने भावनिक झाल्याचे अनोखे चित्र डॉक्टर्स डेच्या निमित्ताने पहायला मिळाले.
डॉक्टर्स डेनिमित्त १ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून रुग्णसेवा करणाऱ्या शहरातील ३२ ज्येष्ठ डॉक्टरांंचा सत्कार, रक्तदान शिबिर, डॉक्टरांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, कोल्ड स्टोरेज बॉक्सचे उद््घाटन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
जुन्या आठवणींना उजाळा
या कृतज्ञता सोहळ््यामध्ये आरोग्याच्या विविध अडचणींमुळे सहभागी होण्यास असमर्थ असलेले डॉ. अशोक दातार, डॉ. शामला दातार, डॉ. मार्तंड राणे, डॉ. शरद केळकर व डॉ. सुनंदा केळकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. विलास भोळे, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. अनुप येवले, डॉ. दीपक आठवले, डॉ. नंदिनी आठवले, डॉ. विद्याधर दातार, डॉ. स्वप्ना दातार, डॉ. हेमंत केळकर, डॉ. रश्मी केळकर उपस्थित होते. सत्कारावेळी ज्येष्ठ डॉक्टर्स भारावून गेले होते. या वेळी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील जुन्या आठवणींनादेखील उजाळा दिला. स्वर्गीय डॉ. स.दा. आठवले यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठांच्या घरी स्वागत
ज्येष्ठ डॉक्टरांच्या निवासस्थानी सत्करासाठी गेलेल्या आयएमए पदाधिकाºयांचे ज्येष्ठ डॉक्टरांच्या कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले. या वेळी ज्येष्ठांना आयएमएच्या मागील काही वर्षातील यश व विशेष कार्याबद्दलची माहिती देण्यात आली.
‘लोकमत’च्या वृत्ताचे वाचन
डॉक्टर्स डे निमित्त १ रोजी सत्कारार्थी ३२ ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञतेबाबतचे वृत्त त्यांच्या नावासह ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या ज्येष्ठांच्या घरी सत्कार होण्यासह त्या ठिकाणी ‘लोकमत’मधील वृत्ताचे त्यांना वाचनही करून दाखविण्यात आले.
रक्तदान शिबिराने सुरुवात
सत्कारापूर्वी सकाळी रक्तदान शिबिराने कार्यक्रमास सुरूवात झाली. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी डॉक्टर्स व औषध कंपन्या प्रतिनिधींनी रक्तदान केले. यामध्ये ३० बॅग रक्त संकलन करण्यात आले.
संध्याकाळी आयएमए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उर्वरित ज्येष्ठ डॉक्चरांसह, डॉक्टरांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, कोल्ड स्टोरेज बॉक्सचे उद््घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. दर्शना शाह यांनी केले.