केऱ्हाळे-मंगरुळ रस्त्याची प्रचंड दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:08+5:302021-06-11T04:12:08+5:30
केऱ्हाळे, ता. रावेर : येथल वीज सबस्टेशन पासून सुमारे पाच किलोमीटर एवढे अंतर असलेला मंगरुळ रस्ता हा अत्यंत ...
केऱ्हाळे, ता. रावेर : येथल वीज सबस्टेशन पासून सुमारे पाच किलोमीटर एवढे अंतर असलेला मंगरुळ रस्ता हा अत्यंत दयनीय झाला आहे. प्रचंड दुर्दशा झाली असून रस्त्याची अवस्था अशीच राहिली तर पावसाळ्यात वापर होऊच शकणार नाही, अशी बिकट स्थिती आहे.
सदर रस्त्याचा कोणता भाग डागडुजी करावा व कोणता नाही... हे समजण्यापलीकडे झाले आहे. लोकांचे मात्र प्रचंड हाल होत असून या विरोधात शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. ते आंदोलनाच्या पवित्र्यातही आहेत. आमदार साहेब इकडे बघाच, असा टाहो शेतकरी फोडत आहेत.
शेकडो हेक्टर शेतजमिनीवर शेतकऱ्यांना वाहिवाटीसाठी एकमेव असलेल्या या रस्त्याने दिवसागणिक अनेक ट्रॅक्टर व ट्रक केळी वाहतूक करीत असतात. मोठमोठे खड्डे व साइडपट्ट्या नेस्तनाबूत झाल्यामुळे कुठे रस्ता व कोठे शेत हे दिसेनासे झाले आहेत. तर पाच किलोमीटरच्या आत दोन मोठे जणू डोह निर्माण झाले आहेत, या ठिकाणी अक्षरशः ट्रक पलटी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाण्याचा विसर्ग काढावा...
या मार्गात मोठ्या डबक्यांमध्ये पाणी साचत असून खोली समजत नसल्याने वाहन पलटी होऊन जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकरिता साचलेल्या पाण्याचा विसर्ग होण्याकरिता चारीमध्ये पाणी काढणे गरजेचे आहे.
दुतर्फा चाऱ्या होणे गरजेचे...
रस्त्याच्या कडेला दुतर्फा चाऱ्या जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे दोन वाहने समोर आल्यावर साइड देण्यावरून बराच वेळ वाया जात असतो. केव्हा तर हमरीतुमरीपर्यंत मजल जात आहे. याकरिता या रस्त्याला पूर्वीचे स्वरूप प्राप्त होऊन वाहतुकीस मोकळा श्वास करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गत दोन वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नंदा पाटील यांनी दोन किलोमीटर रस्ता तयार केला आहे. मात्र उर्वरित सहा किलोमीटर रस्ता हा शेवटची घटिका मोजत असून पुढील रस्त्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जावी.
मंगरूळ रस्त्यावर कसरत करून डबक्यातून मोटारसायकल बाहेर काढताना शेतकरी. (छाया : रमेश पाटील)