दु:शासन पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2017 05:21 PM2017-07-05T17:21:24+5:302017-07-05T17:21:24+5:30
विनोबा भावेंनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असं म्हटल होतं. त्यावर पुढे अटलजींनी एका सभेत शेरा मारला होता.. ‘‘अनुशासन कैसा? यह तो दु:शासन पर्व था!’’
>लहानपणापासून मीही अधून-मधून शाखेत जात असे. मग आता मलाही पोलीस पकडणार की काय? संध्याकाळी चिंताक्रांत होऊन मी बाबांना विचारलं की, शाखेत जाणा:यांना पोलीस पकडतात कां? त्यावर त्यांनी जास्त चर्चा न करता सांगितलं, की ‘मुलांना कोणी पकडत नाही, जा खेळायला!’ वडील स्वत: वकील असल्याने त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मी निश्चिंत झालो. ही जास्तीची माहिती मित्रांना सांगून शाळेत थोडा भावही खाऊन घेतला. पण आजूबाजूला काहीतरी वेगळं घडतंय, हे जाणवत होतं. मग काही दिवसांनी त्याच ज्ञानी मित्राकडून समजलं- ‘‘आणीबाणी लागलीय’’, आम्हाला तेव्हा फार तर परीक्षेचं टाईम-टेबल लागलंय एवढंच माहिती असे. मग ही आणीबाणी कशी ‘लागते’ हे कळत नव्हतं.
आणिबाणीमुळे भारताच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात काय काय परिणाम झाले, हे तर आता सगळयांनाच माहिती आहे. पण माङयासारख्या शाळकरी मुलांच्या छोटय़ाशा, मर्यादित विश्वावर आणीबाणीचा कसा परिणाम झाला, तेही वाचण्यासारखं आहे. घरातली मोठी मंडळी सकाळी वर्तमानपत्र वाचताना काहीतरी गंभीर चर्चा करू लागली. ‘‘तरी त्याला सांगितलं होतं-सांभाळून रहा.’’ असे संदर्भहीन वाक्य मधूनच ऐकू येऊ लागले. गावात एरवी बाजारात, दुकानात भेटणारे काही लोक अचानक दिसेनासे झाले. त्यांच्याबद्दल चर्चा करण्याचीसुद्धा कोणाची इच्छा नसे. एरव्ही न चुकता राजकारणाबद्दल तावातावाने बोलणारी, वाद घालणारी काका मंडळी आता राजकारण हा शब्द उच्चारला तरी विषय बदलू लागली. याचे पडसाद आम्हा मित्रांच्या गप्पा- टप्पांमध्येही उमटू लागले. ‘‘इंदिरा गांधी एकदम डेंजर बाई आहे, कुणालाही पकडून जेलमध्ये टाकते.’’ ही जास्तीची ज्ञानप्राप्ती या गप्पांमधून झाली. या पलीकडे फारसं काही माहिती नव्हतं. लहानपणापासून सगळ्या विषयांतलं सगळं ज्ञान असलेली सर्वज्ञ पिढी अद्याप जन्माला यायची होती. शाळकरी मुलाने शाळकरी मुलासारखं वागावं, हा सरळ हिशोब होता.
माङो वडील वकील असल्यामुळे असेल कदाचित्. पण माङया घरी हा परिणाम थोडा जास्त जाणवत होता. पूर्वी कामासाठी येणारी माणसं- पक्षकार हे सकाळी ऑफिसच्या वेळातच यायचे. बाबांचा तसा दंडकच होता. पण आता रात्री- बेरात्री, केव्हाही घराची बेल वाजत असे. कुठले कुठले अपरिचित लोक येत. अपरात्र होईर्पयत बंद दाराआड चर्चा सुरू असायची. कधी कधी तर पहाटेर्पयत! एकदा असेच अपरात्री सल्ला घ्यायला आलेल्या एका वयस्कर व्यक्तीच्या बाबाच पाया पडले. माझं आश्चर्य चेह:यावर मावत नव्हतं. नंतर बाबांनी सांगितलं- ‘‘बाळा, तो फार मोठा माणूस आहे. ‘‘गंमत म्हणजे, थेट आजतागायत मला कळलेलं नाही, की ते कोण होते? कधी कधी कोणीतरी अपरिचित काकू-मावशा संकोचत घरी यायच्या. पदर तोंडाला लावून आईशी काहीतरी बोलायच्या. कधी कधी तर रडायच्या. आई त्यांना कपाटातून पैसे काढून द्यायची आणि धीर द्यायची. ‘‘धीर सोडू नका हो.. येतील ते घरी.. देव आहे ना!’’ हे सगळं काय चाललंय, हे आम्हाला तर अजिबात समजत नसे. विचारायची सोय नव्हती. कारण, कोणताही प्रश्न विचारला की, एकतर, ‘गप्प बैस, किंवा मग जा तू खेळायला’ अशी दोनच उत्तरं मिळत असत. पण नंतर घरात जी चर्चा हळू आवाजात होई, त्यावरून काही पुसटसे अंदाज लावता येत होते.
एके दिवशी वडिलांनी गंभीरपणे आईला सांगितलं- ‘‘बहुदा माझा नंबर लागणार आता, आपल्या घरावर नजर आहे. ही मंडळी सल्ल्यासाठी माङयाकडे नेहमी येतात. लक्षात येणारच.. ‘‘झालं ! तेव्हापासून घरातलं वातावरण भलतंच तंग झालं. सगळेच गंभीर! बाबा कोर्टातून घरी येऊन पोहोचेर्पयत आईचा जीव था:यावर नसे. मला कळेना, की हे असं आणखी किती दिवस चालणार? बाबांना अटक होणार का? झाली तर मग मी काय करायचं?
सुदैवाने यातलं काहीच झालं नाही. कारण असेच एकदा बाबा कोर्टातून लवकर घरी आले. त्यांच्या चेह:यावर आनंद मावत नव्हता. त्यांनी आल्या आल्या घोषणा केली- ‘‘शेवटी आणीबाणी उठली.. निवडणुका जाहीर झाल्या.’’
‘आणिबाणी उठली’ म्हणजे नक्की काय झालं, देव जाणे. पण आनंद नेहमीच संसर्गजन्य असतो. त्यामुळे मलाही (काही फारसं न कळताही) आनंद झाला- -आणीबाणी उठली. विनोबा भावेंनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असं म्हटल होतं. त्यावर पुढे अटलजींनी एका सभेत शेरा मारला होता.. ‘‘अनुशासन कैसा? यह तो दु:शासन पर्व था!’’ - अॅड.सुशील अत्रे