जळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत १.४० मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:35+5:302021-07-04T04:12:35+5:30

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत ...

Ground water level in Jalgaon district increased by 1.40 meters | जळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत १.४० मीटरने वाढ

जळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत १.४० मीटरने वाढ

Next

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत असून यंदाही भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी १.४० मीटरने वाढली असून सर्वाधिक ४.५२ मीटरची वाढ यावल तालुक्यात झाली आहे तर सर्वात कमी ०.०२ मीटरने एरंडोल तालुक्यात पातळी वाढली आहे. १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात १.०५ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी मे महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील चोपडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांची तुलना पाहता यंदा ही वाढ झाली असून गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा मान्सूनपूर्व सर्व्हेक्षण झाले असून या नंतर अजून मान्सून पश्चात सर्व्हेक्षण होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर आणखी वाढ दिसून येण्याची आशा आहे.

यंदा झालेल्या सर्वेक्षणानुसार यावल तालुक्यात सर्वाधिक ४.५२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. त्या खालोखाल मुक्ताईनगर तालुक्यात ३.६० मीटर, रावेर तालुक्यात ३.१२ मीटर, जळगाव तालुक्यात १.७६ मीटर, बोदवड तालुक्यात १.५७ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. या सोबतच अमळनेर तालुक्यात १.४६ मीटर, धरणगाव तालुक्यात १.१४ मीटर, पाचोरा तालुक्यात १ मीटर, भुसावळ तालुक्यात ०.९२ मीटर, जामनेर तालुक्यात ०.३९ मीटर, भडगाव तालुक्यात ०.२७ मीटर, चाळीसगाव तालुक्यात ०.१६ मीटर, पारोळा तालुक्यात ०.०६ मीटर, एरंडोल तालुक्यात ०.०२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे.

चोपडा तालुक्यात भूजल पातळी घटली

जिल्ह्यातील १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात ही पातळी १.०५ मीटने घटली आहे. यंदा भूजल पातळीत घट झालेल्या या तालुक्यात मे महिन्यातील मान्सूनपूर्व सर्व्हेक्षणात २.०४ मीटरने वाढ झाली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही या तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे.

------------

गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. आता मान्सून पश्चात सर्वेक्षणात आणखी आकडेवारी पुढे येईल.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भू वैज्ञानिक

Web Title: Ground water level in Jalgaon district increased by 1.40 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.