भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 03:04 PM2019-03-10T15:04:17+5:302019-03-10T15:07:27+5:30
कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे
साधारण अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून येथे पाणी प्रश्न फारच बिकट बनला आहे. यामुळे गावापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर उमरखेड शिवारात एक विहीर अधिग्रहित केली होती. जेमतेम पाण्यामुळे येथे साधारण पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. मात्र अधिग्रहित विहिरीनेदेखील तळ गाठल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आह.े
गावातील विहिरी कोरड्या झाल्या
या परिसरात गेल्या दोन वर्षांत पावसाळा तुरळक झाल्याने विहिरींत जलपातळ्या वाढल्या नाही. परिणामी गावातील विहिरी चक्क हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळ नाही, विहिरी आटल्याने ग्रामस्थांना परिसरातील शेत शिवारातून बैलगाडी, सायकल, तर गोरगरिबांना चक्क डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणावे लागत आहे.
तितूर नदीचे पाणी हरण
भडगाव तालुका हा संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रात मोडला जातो. मात्र या तालुक्यातील पाच गावांना याचा कोणताही लाभ नाही. तर या पाच गावासाठी अमृत असलेल्या तितूर नदीचे पाणी पावसाळ्यातच गायब झाले आहे कारण तितूर नदीवर चाळीसगाव तालुका सीमेपर्र्यंत अनेक ठीकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. परिणामीे भडगाव तालुक्यातील गावात तितूर नदीचे पाणी आलेच नसल्याने मळगाव, तांदूळवाडी, भोरटेक, उमरखेड, कजगाव, पासर्डी या सहा गावांसह पाचोरा तालुक्यातील पिंप्री व घुसर्डी या आठ गावात तितूरचे पाणी चक्क पावसाळ्यातदेखील पोहोचले नाही. परिणामी आतापासून या गावात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. यात मळगाव व तांदूळवाडीचा पाणी प्रश्न फारच बिकट झाला आहे इतर ही गावात पाणी समस्या आहे मात्र पर्याय शोधत पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडविला जात आहे मात्र एप्रिलमध्ये या आठही गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल असेच चित्र दिसत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गुरढोराचा पाणी प्रश्न बिकट
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तांदूळवाडी येथे पाणी प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान शेत शिवारातून पाणी आणून भागविली जात आहे. मात्र गुरढोराचा पाणी प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. कारण शेत शिवारातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काहींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत गुरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
आठ खेड्यातील बहुतांश विहिरी कोरड्या
गेल्या पावसाळ्यात वरील आठ गावात तितूर नदीत पाणी पोहचलेच नसल्याने शेत शिवारातील विहिरी,गावातील विहिरी यांच्या जल पातळ्या वाढल्या नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे कारण बºयाच विहिरी या कोरड्या पडल्या आहेत तर काही विहिरी चोवीस तासच्या ब्रेकनंतर अर्धा ते एक तास चालतात. यात गुरढोराचा पाणी प्रश्न सुटत आहे