खचलेल्यांना उभारी देणारा शिक्षक हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 12:51 AM2017-03-04T00:51:04+5:302017-03-04T00:51:04+5:30
मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे यांचे निधन : ‘विनर्स क्लब’ व्दारे विद्यार्थ्यांना द्यायचे आत्मविश्वास
जळगाव : जीवनात अपयश आल्यानंतर अनेक विद्यार्थी खचतात व गैरमार्गांचा अवलंब करतात. आयुष्यात चढ-उतारांचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागतो. त्यामुळे संघर्षाचा सामना करून त्यावर मात करा, असा सल्ला देत अनेक खचलेल्या विद्यार्थ्यांना उभारी देणारे व एक यशस्वी युवक तयार करणारे भाऊसाहेब काशीनाथ लाठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक जयप्रकाश लक्ष्मण लांबोळे (वय ४५) यांचे शुक्रवारी पहाटे २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थी व शिक्षक प्रिय
विद्यार्थी व शिक्षक प्रिय अशी त्यांची ओळख होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ व बहिणी असा परिवार आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा या लहान गावापासून सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासात त्यांनी अपयशाने खचलेल्या अनेक युवकांचे यशस्वी जीवन घडविले आहे.
भा.का.लाठी विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता समाजात वावरताना आवश्यक असलेले व्यवहारीक ज्ञान देखील त्यांनी दिले. त्यांच्या निधनामुळे शुक्रवारी शाळेला सुट्टी देण्यात आली व आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळातच आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, मान्यवरांना धक्का बसला.
लांबोळे सर जळगावात भा.का.लाठी शाळेत शिकविण्यासाठी आल्यानंतर मी त्यांच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे. दुसरीपासून त्यांच्यासोबत सुरु झालेला प्रवास आय.पी.एस. झाल्यानंतर देखील सुरु होता. आई-वडीलांनंतर लांबोळे सर माझे आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.
-राहुल लोढा, आय.पी.एस. अधिकारी