संचालकांच्या फोडाफोडी नाट्यानंतर ग.स.त हाणामारी; लोकसहकारच्या संचालकांना धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:40 AM2022-05-13T10:40:58+5:302022-05-13T10:41:56+5:30
Jalgaon : सहकार गटाचे ११ संचालक मतदानासाठी ग.स.च्या समोर आले. तेव्हा त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर त्यांना गाडीतून उतरता आले नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात हे सर्वजण मतदानासाठी हॉलमध्ये पोहोचले.
जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.च्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यात उदय पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर रवींद्र सोनवणे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र त्या आधी लोकसहकार गटातून सहकार गटाकडे आलेल्या रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांना धक्काबुक्की करण्यात आली. सहकार गटाचे ११ संचालक मतदानासाठी ग.स.च्या समोर आले. तेव्हा त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर त्यांना गाडीतून उतरता आले नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात हे सर्वजण मतदानासाठी हॉलमध्ये पोहोचले. हॉलमध्येसुद्धा रवींद्र सोनवणे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून ग.स.च्या अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज ड्रामा सुरु होता. ग.स.निवडणुकीत ९ संचालक सहकार गटाचे, प्रगतीचे ६ आणि लोक सहकारचे ६ जण निवडून आले होते. या त्रिशंकू परिस्थितीमुळे ग.स.च्या अध्यक्षपदासाठी अनेकांनी तयारी केली होती. त्यात लोक सहकार गटाकडून निवडून आलेले रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सहकार गटाला पाठिंबा दिला.
आमच्यावर हल्ला झाला - उदय पाटील
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ग.स.मध्ये येत असतानाच आमच्यावर हल्ला झाला. तसेच जवळपास १५ मिनिटे वरच्या मजल्यावर येता आले नाही. त्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. अखेर पोलीस बंदोबस्तातच वर यावे लागले. १०० वर्षाच्या इतिहासात या संस्थेला हा डाग लागला आहे. लोकसहकार गटाचे पॅनल प्रमुख मनोज पाटील आणि दिलीप चांगरे यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला, असा आरोप नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांनी केला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलतांना उदय पाटील म्हणाले की, मी आणि इतर संचालक यांच्या जीविताला धोका आहे. आमच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला बराच वेळ गाडीत डांबले. ज्या सभासदांनी निवडून दिले हा त्या सभासदांचा अपमान आहे. आता पोलिसांनीच आम्हाला संरक्षण द्यावे आणि घरी सोडावे. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. तसेच मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न होता. सुशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी आणि शिक्षक असलेल्या या संचालकांनीच हे काम केले आहे. त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलीन झाली, असेही उदय पाटील यांनी सांगितले.
असा दिला सहकारला पाठिंबा
नवनिर्वाचित उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की, लोक सहकार गटाचे सहा संचालक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत कुणासोबत जायचे यावर सहा पैकी पाच संचालकांनी सहकार गटासोबत जाण्यास उत्सुकता दाखवली होती. त्या पाच संचालकांमध्ये रवींद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रतिभा सुर्वे, सुनील सूर्यवंशी, अनिल पाटील यांचा समावेश होता. फक्त एका संचालकांचा याला विरोध होता. मात्र आम्ही दोघांनी सहकार गटासोबतच जाण्याचा निर्णय घेतला. इतर तीन जणांनी त्यातून माघार घेतली.’
ज्ञानेश्वर सोनवणेंना सभागृहातच धमकी?
सहकार गटाला पाठिंबा देणारे ज्ञानेश्वर सोनवणे यांना प्रतिभा सुर्वे आणि सुनील सूर्यवंशी यांनी सभागृहातच धमकी दिली, हा सर्व प्रकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर घडला, असा आरोप ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केला.
उदय पाटलांना अश्रू अनावर
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना उदय पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. पाटील हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र झालेल्या हल्ल्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. तसेच आमच्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी संरक्षणात घरी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आम्ही सरकारी नोकर आहोत आणि ही नोकरी महत्त्वाची आहे. ग.स. हे काही आमचे पोट भरण्याचे साधन नाही, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले होते.