जळगावातील रस्त्यांच्या मालकी बदलाबाबत पालकमंत्र्यांना साकडे
By admin | Published: April 7, 2017 03:25 PM2017-04-07T15:25:21+5:302017-04-07T15:25:21+5:30
मुंबई येथे विधानभवनात पालकमंत्र्यांची भेट घेत सर्व कागद पत्रे सादर केली व या निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला.
जळगाव : शहरातील 6 रस्त्यांची मालकी बदल करण्याच्या निर्णयात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका व्यक्त करीत या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई येथे विधानभवनात पालकमंत्र्यांची भेट घेत सर्व कागद पत्रे सादर केली व या निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला.
अधिकार कक्षाबाहेरचा हा निर्णय रद्द करावा
केंद्र सरकारने राष्ट्रीय राज्य मार्ग घोषित केलेल्या रस्त्यांची मालकी बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? असा सवाल उपस्थित करीत डॉ. चौधरी यांनी औरंगाबाद तसेच पाचोरा रस्ते अधिकार कक्षेबाहेर असूनही त्यांची मालकी बदलण्यात आल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अधिकार कक्षाबाहेर असलेला हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी या बाबत सर्व ऐकून घेत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
मनपाला विश्वासात घेतले नाही
हे सहा रस्ते मनपाकडे देण्यात आले असले तरी यासाठी जळगाव मनपाला विश्वासात घेतले नसल्याचेही ते म्हणाले. या संदर्भात आपण मनपाशी चर्चा केली असून त्यांच्याकडूनही तसे सांगण्यात आल्याचे डॉ. चौधरी म्हणाले.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
या रस्त्यांची मालकी बदलण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला.
दूध का दूध करा
या निर्णयात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केली. शहरातही चर्चा असून यामुळे आपली प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. त्यामुळे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करा अशी मागणी त्यांनी केली.
पंतप्रधानांना पत्र
या विषयी डॉ. चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यात या सर्व मुद्दय़ांचा उल्लेख केला आहे.