गुढीपाडवा होणार गोड, आवक वाढल्याने साखरेच्या भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:11 PM2018-03-16T13:11:35+5:302018-03-16T13:11:35+5:30
निर्यात नाही
विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ - बाजारात साखरेच्या आवकमध्ये झालेली वाढ व दुसरीकडे निर्यात सुरू न झाल्याने ऐन उन्हाळ््याच्या हंगामातच साखरेच्या दरात प्रति क्विंटल २०० ते २५० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे दोन दिवसांवर आलेला गुढीपाडवा गोड होणार असल्याचे चित्र आहे.
यंदा उसाचे क्षेत्र वाढून साखरेचे प्रचंड उत्पादन झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात साखरेची आवक सुरू आहे. त्यात अद्यापही राज्यातील ६५ टक्के साखर कारखाने सुरू असल्याने ही आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
निर्यातीला मंजुरी मात्र अंमलबजावणी नाही
सरकारने साखरेच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात साखर संघ आणि खाद्य मंत्रायलयात बोलणी सुरू असल्याने निर्यातीला सुरुवात झाली नसल्याचे जाणकारांनी सांगितले. या सर्वांचा परिणाम होऊन देशात साखरेचा प्रचंड साठा वाढत आहे. परिणामी मागणी कमी, पुरवठा जास्त यामुळे भावात घसरण होत आहे. यामुळे मात्र ऊस उत्पादक शेतकºयांना फटका बसणार आहे तर ग्राहकांना याचा फायदा होत आहे.
अनुदानाबाबत अनिश्चितता
सध्या राज्यात साखर कारखाने सुरू असले तरी ते अडचणीत असल्याने त्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. एक तर ऊसाचे उत्पादन जास्त आल्याने कारखान्यांमध्ये त्याची आवक वाढल्याने कारखाने उत्पादन सुरूच ठेवत आहे. मात्र सरकार निर्यातीबाबत ठोस व तत्काळ निर्णय घेत नसल्याने कारखान्यांना किती अनुदान दिले जाईल, या बाबत अजूनही अनिश्चितता आहे. या संदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता असल्याने तेवढा दिलासा साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकºयांना मिळणार आहे.
अनुदानाच्या अपेक्षेने कमी दरात विक्री
सध्या साखर कारखान्यांनाच साखर उत्पादन प्रति क्विंटल ३४०० ते ३५०० रुपये दराने पडत आहे. मात्र अनुदानाच्या अपक्षेने ते २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलने कमी भावाने साखरेची विक्री करीत आहे. असेच जर सुरू राहिले तर शेतकºयांना एफआरपी प्रमाणे दरही देणे शक्य होणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
‘सरप्लस’ उत्पादनाकडे लक्ष
सध्या कारखाने सुरूच असल्याने व उपलब्ध साठा जास्त असल्याने कारखान्यातील उत्पादन थांबल्यानंतर ‘सरप्लस’ उत्पादन किती होते, यावर निर्यात व त्यानंतर देशातील साखरेचे दर निश्चित होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे पुढे साखरेच्या दरात वाढ की घट याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
दोन आठवड्यात भावात घसरण
गेल्या दोन आठवड्यांपासून साखरेच्या भावामध्ये घसरण सुरू झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात साखरेचे होलसेल भाव ३६०० रुपये प्रति क्ंिवटल होते, ते आता ३३५० ते ३४००वर आले आहेत. अशाच प्रकारे किरकोळ ३७ रुपये प्रति किलोवरून ३५ ते ३६ रुपये प्रति किलोवर आले आहेत.
एप्रिलपासून भाव वाढीची शक्यता
एरव्ही उन्हाळ््यात दरवर्षी शीतपेय, आईस्क्रिम यासाठी साखरेची मागणी वाढून मार्च ते मे महिन्यादरम्यान नेहमीपेक्षा दीडपट साखरेचा खप होतो. मात्र यंदा आवक जास्त असल्याने मार्च महिन्यात भाव कमी झाले असले तरी एप्रिल महिन्यापासून मागणीत वाढ व निर्यात सुरू झाल्यास साखरेचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.
सध्या साखरेची आवक वाढली असून देशातून निर्यातही बंद आहे. त्यामुळे साखरेच्या भावात घसरण झाली आहे. मात्र एप्रिल महिन्यापासून भाववाढीची शक्यता आहे.
- आनंद श्रीश्रीमाळ, साखर व्यापारी.