जळगावात गुढीपाडव्याची उलाढाल ७० कोटींवर, सोन्याला तिप्पट मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 PM2018-03-19T12:36:46+5:302018-03-19T12:37:31+5:30
वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी प्रचंड गर्दी
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १९ - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात तब्बल ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोन्याची मागणी तिप्पट वाढली. त्यात १० कोटींची उलाढाल झाली. या सोबतच घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीतही मोठी उलाढाल झाली. श्रीखंडला मोठी मागणी होती. आम्रखंडचा तुटवडा जाणवला.
बाजारात गेल्या २-३ दिवसांपासून उत्साह दिसून येत आहे. विशेषत: रविवार असला तरी आज दुकाने सुरु होते. ग्राहकांचीही मोठी गर्दी होती. अनेक वित्तीय संस्थांकडून शून्य टक्के व्याज दराने आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे होणारा व्याजपुरवठा व इतर योजनांमुळे वाहन व इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ सध्या सुखावली आहे.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात ३ कोटींची उलाढाल
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात ३ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदा एकट्या एसीमध्ये ६० टक्के ग्राहकी राहिली तर त्या खालोखाल एलईडी टी.व्ही., फ्रीजला ३० टक्के त्यानंतर वॉशिंग मशिन आणि उर्वरित ओव्हन इत्यादी वस्तूंना १० टक्के ग्राहकी होती.
९०० दुचाकींची विक्री
शहरातील एकाच शोरुममध्ये पाडव्याला ५००च्यावर दुचाकींची विक्री झाली. शहरात एकूण ९०० दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. वेगवेगळ््या मॉडेल पाहता दुचाकीमध्ये सात कोटी रुपयांची उलाढाल दुचाकीमध्ये झाली असावी, असे सांगण्यात येत आहे. काही कंपन्यांच्या निवडक दुचाकींचा स्टॉक आगावू मागवून ग्राहकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न विक्रेत्यांकडून करण्यात आला.
२५० चारचाकींची विक्री
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनाजोगो वाहन मिळावे म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांनी चारचाकींचे बुकिंग करून ठेवले होते. यात तीन-चार दिवसांपासून अधिक भर पडली. शहरातील एकाच दालनात पाडव्यासाठी ३५० चारचाकींचे बुकिंग करण्यात आले होते. या दालनातून १२५ चारचाकींची डिलिव्हरी होऊन एकूण २५० चारचाकींची विक्री होऊन साधारण १५ कोटींची उलाढाल झाली असावी, असे सांगण्यात आले.
चार टन श्रीखंडाची विक्री
गुढीपाडव्याला श्रीखंडाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा तर यात मोठी भर पडली. विविध कंपन्यांनी श्रीखंडासोबत काही वस्तू भेट देऊ केल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. यंदा तब्बल चार टन श्रीखंड विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला.
आम्रखंडचा तुटवडा
श्रीखंडासोबतच यंदा आम्रखंडलादेखील चांगली मागणी राहिली. दुपारपासून तुटवडा जाणवला. त्यामुळे ग्राहकांनी श्रीखंड घेणेच पसंत केले.
‘रिअल इस्टेट’मध्ये उत्साह
गुढीपाडव्यामुळे ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात चैतन्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांनी घराचे गुढीपाडव्यासाठी बुकिंग करून ठेवले होते. यातील काही जणांनी आज ताबा घेतला तर काही जणांनी आजच्या मुहूर्तावर बयाणा देऊन घर घेण्याचा मुहूर्त साधला. यामध्ये साधारण ३५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला. सोने खरेदी करून अनेकांनी मुहूर्त साधला. यासाठी ‘स्पेशल भाव’ देण्यात आला होता, त्यास चांगला प्रतिसाद राहिला.
- सिद्धार्थ बाफना, सुवर्ण व्यावसायिक.
दुचाकी विक्रीस मोठा प्रतिसाद राहिला. रविवार असला तरी दिवसभर सुरू असलेली गर्दी रात्रीपर्यंत सुरू होती.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंडाची मोठी विक्री होते. त्यानुसार यंदाही मोठी मागणी राहिली. यंदा आम्रखंडलादेखील मोठी मागणी होती. ते दुपारीच संपले.
- उदय चौधरी, विक्रेते.