जळगावकरांनी केले घरोघरी गुढीचे पुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:44+5:302021-04-14T04:14:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दरवर्षी थाटामाटात साजरा केला जाणारा गुढी पाडवा यंदा मात्र सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायजेशनच्या नियमांमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दरवर्षी थाटामाटात साजरा केला जाणारा गुढी पाडवा यंदा मात्र सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायजेशनच्या नियमांमुळे घरोघरीच पण आनंदात साजरा करण्यात आला. जुन्या गावातील रथचौकात दरवर्षी मोठी गुढी उभारली जाते. मात्र तेथेही यंदा पाच फुटाचीच गुढी उभारण्यात आली होती. तर श्रीराम मंदिर संस्थानमध्ये विविध कार्यक्रमांनी गुढी पाडवा साजरा करण्यात आला. त्यासोबतच जळगावकरांनी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. कोरोनाच्या संकटात देखील नववर्षाचा उत्साह दिसून आला. त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
गुढी पाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरूवात. त्यामुळे श्रीराम मंदिर संस्थानच्या परंपरेनुसार श्रीराम मुर्तीला नवे वस्त्र, पंचामृत, अभिषेक, महापुजा करण्यात आली. त्यावेळी ब्रम्हध्वज पुजन, महानैवेद्य, आरती, श्रीराम नवरात्र प्रथम दिन उपाचर करण्यात आले. मंदिरात उभारण्यात आलेल्या गुढीचे पुजन श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांनी केले.
त्यासोबतच दरवर्षी रथचौकात दीपक तरुण मंडळातर्फे गुढी पुजन केले जाते. तेथे मोठी गुढी उभारली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे मंडळाच्या फक्त पाच कार्यकर्त्यांनी तेथे येऊन गुढी उभारली आणि त्याचे पुजन केले. त्याशिवाय इतर कुठेही सार्वजनिक गुढी पुजनाचा कार्यक्रम झाला नाही. रथचौकात दीपक तरुण मंडळाचे योगेश वाणी, सागर शिंपी, प्रसाद गुरव, अनुज शर्मा, स्वामी तांबट या पाच कार्यकर्त्यांनी जाऊन गुढी उभारली.
महापौरांनी केले गुढी पुजन
महापौर जयश्री महाजन यांनी त्यांच्या मेहरुण परिसरातील निवासस्थानीच गुढीपुजन केले. दरवर्षी महापालिकेत गुढी उभारली जाते. यंदा मात्र महापालिकेत गुढी उभारली गेली नव्हती.
गुढी पाडव्याचे सार्वजनिक कार्यक्रम जरी साजरे झाले नसले तरी घरोघरी गुढी उभारण्यात आली. त्याचा उत्साह सर्वत्र होता. त्यासोबतच गोडाधोडाच्या जेवणात काही ठिकाणी आंब्याचा रस, बासुंदी आणि पुरण पोळ्यांची रेलचेल होती. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात विविध प्रकारचे आंबे उपलब्ध झाले होते. गुढीला लावण्यासाठी साखरेचे हार आणि कंगण यांची विक्री देखील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात झाली.