भुसावळ येथे मर्र्चंट नेव्ही (संरक्षण) क्षेत्रातील भरतीबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:57 PM2018-09-22T16:57:52+5:302018-09-22T16:58:53+5:30
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागात संरक्षण क्षेत्रातील भरतीबाबत पुणे येथील राजेश डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या एम.व्ही.वायकोळे अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.एस.बी.पाटील, पर्यवेक्षक प्रा. यु. बी. नंदाणे, प्रा.एस. के.चौधरी, प्रा.टी.एल. चौधरी होते.
राजेश डुंबरे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षण दलातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. संरक्षण दलात आर्मी, नेव्ही मर्चंट नेव्ही, एअरफोर्स, पोलीसदल या भरतीविषयी सखोल अशी माहिती देवून या क्षेत्राकडे जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छाशक्ती, जिद्द मेहनत, चिकारी हे गुण असणे महत्त्वाचे असते. विद्यार्थी जीवनात निराश न होता पुढे गेले पाहिजे. आपल्या जीवनातील रस्ता निवडताना पूर्ण मनाची तयारी करुनच मार्गस्थ झाले पाहिजे. एन.डी.ए. कॉलेजला प्रवेश मिळविण्यासाठी तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यासाठी विद्यार्थ्यांची मेहनत करण्याची तयारी हवी, असे सांगितले.
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मैदानी, जनरल नॉलेज, वैद्यकीय या परीक्षांमधून जावे लागते. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला तुमचे आई-वडील, गुरू, मित्र यांची साथ मिळते. त्यामुळे तुम्हांला यश निश्चित मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन प्रा. बी. डी. चौधरी यांनी केले. प्राचार्या वायकोळे यांनीही मार्गदर्शन केले. आभार प्रा. टी. एल. चौधरी यांनी मानले. समन्वयक प्रा. आर. एम. खेडकर, प्रा.एस. ए. पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.